shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाखांदूर विश्रामगृह परिसरात ‘आग्या’ मधमाश्यांचा थरार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह | विशेष प्रतिनिधी
लाखांदूर (ता.प्र.) : लाखांदूर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात निसर्गाचा एक अनोखा पण तितकाच धोकादायक प्रकार समोर आला आहे. परिसरातील जुन्या वटवृक्षावर तब्बल २० ते २५ मधमाश्यांची मोठी पोळी असून, या मधमाश्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्रामगृह परिसर हा वृक्षांनी नटलेला असून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. याच परिसरातील एका जुन्या वटवृक्षावर ‘आग्या’ जातीच्या मधमाश्यांनी आपली मोठी वसाहत उभारली आहे. मधमाश्यांची संख्या मोठी असल्याने येथून ये-जा करणारे नागरिक, कर्मचारी तसेच अधिकारीही सतर्क झाले आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ‘आग्या’ मधमाश्या अत्यंत आक्रमक स्वभावाच्या मानल्या जातात. जर चुकून त्यांच्या पोळ्याला धक्का लागला, मोठा आवाज झाला किंवा झाडाच्या फांद्या हलल्या, तर त्या मोठ्या थव्याने हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

विश्रामगृह परिसरात सध्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने येथे मजूर, कर्मचारी आणि नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे धोका आणखी वाढल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, हे वडाचे झाड जुने असून त्यावर अनेक मोठी पोळी असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे वनविभाग, महसूल प्रशासन किंवा संबंधित शासकीय विभागाने तातडीने दखल घेऊन सुरक्षित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सूचना फलक लावणे, तज्ज्ञांच्या मदतीने पोळ्यांचे स्थलांतर करणे आणि बांधकामस्थळी विशेष खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्हचा सवाल : प्रशासन जागे होणार का? की एखादी दुर्घटना घडल्यानंतरच हालचाल होणार?
close