shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संतांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीचे पेव

महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि क्रांतिकारकांची पुण्यभूमी आहे. या भूमीने मानवतेचा, विवेकाचा आणि समतेचा संदेश जगाला दिला. संत एकनाथ यांनी योगी पुरुषाचे महत्त्व सांगताना त्याची तुलना पाण्याशी केली. पाण्यापेक्षा योगी पुरुष श्रेष्ठ आहे असे ते आपल्या अभंगात सांगतात.पाण्याची गोडी जिभेपुरती मर्यादित असते; परंतु योगी पुरुष आपल्या वर्तनाने, विचारांनी आणि कृतीने सर्व इंद्रियांना समाधान देतो.

संत गाडगेबाबा यांनी “देव देवळात नसून माणसात आहे” असा स्पष्ट आणि ठाम संदेश देत अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केला. त्यांनी हातात खराटा घेऊन फक्त गावातील घाण नाही, तर लोकांच्या मनातील अज्ञानही दूर करण्याचा प्रयत्न केला. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा पाया घातला. संत बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या साध्या पण प्रभावी ओव्यांमधून जीवनाचे वास्तव उलगडत लोकांना विचार करायला शिकवले.
   अशा महान परंपरेचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात आज भोंदूगिरीचे वाढते प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. अज्ञान, भीती, अडचणी आणि श्रद्धा यांचा गैरफायदा घेत काही लोक स्वतःला “बाबा”, “गुरु” किंवा “अंकशास्त्रज्ञ” म्हणवून घेतात आणि लोकांची फसवणूक करतात. अल्प शिक्षण असतानाही स्वतःला तज्ज्ञ म्हणून सादर करणे, चमत्कारांच्या गोष्टी सांगणे, मध किंवा तथाकथित “चमत्कारी” वस्तू लाखो रुपयांना विकणे, लोकांच्या अडचणींवर “गुप्त उपाय” सांगून पैसे उकळणे—ही सर्व भोंदूगिरीची आधुनिक रूपे आहेत.
    याहूनही गंभीर बाब म्हणजे काही प्रकरणांमध्ये मानसिक, आर्थिक आणि शारीरिक शोषणाचे आरोप समोर येतात. लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांच्या जीवनाशी खेळणे ही केवळ फसवणूक नाही, तर एक सामाजिक गुन्हा आहे.
   म्हणूनच प्रत्येकाने काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे
जो चमत्कारांचा दावा करतो, त्याच्यापासून सावध राहिले पाहिजे, 
जो “गुप्त उपाय” सांगतो, त्याच्यावर संशय घेतला पाहिजे, 
जो एकांतात भेटण्यास सांगतो, त्याला ठाम नकार दिला पाहिजे. 
  आजच्या काळात आणखी एक धोकादायक प्रवृत्ती दिसते—अशा भोंदू व्यक्तींच्या कार्यक्रमांना काही वेळा प्रभावशाली लोक किंवा राजकीय नेते उपस्थित राहतात. त्यामुळे सामान्य माणसांमध्ये असा समज निर्माण होतो की “मोठी माणसं जातात, म्हणजे तो खरा असणार.” ही मानसिकता अत्यंत घातक आहे.
   मात्र, वस्तुस्थिती वेगळी असते. सर्वच नेते एकसारखे नसतात. अनेक वेळा ते सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहतात, याचा अर्थ ते त्या व्यक्तीच्या चुकीच्या कृत्यांना समर्थन देतात असे नाही. परंतु, सामान्य लोक जर विचार न करता अनुकरण करत असतील, तर अंधश्रद्धेला खतपाणी मिळते. म्हणूनच व्यक्ती नव्हे, तर तिचे विचार आणि कृती तपासणे अधिक महत्त्वाचे आहे.
   भोंदूगिरीविरोधात लढण्यासाठी शासन आणि समाज या दोघांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात २०१३ साली महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा लागू करण्यात आला. या कायद्यामुळे अनेक भोंदू बाबांवर कारवाई झाली आहे. तरीही केवळ कायदा असून चालणार नाही; त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती आवश्यक आहे.
पोलिसांनी तक्रारी मिळताच तात्काळ तपास करणे, पीडितांना संरक्षण देणे आणि दोषींना शिक्षा मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे.   
                                                        त्याचबरोबर समाजानेही जागरूक राहिले पाहिजे. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक स्वीकारणे, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे आणि भोंदूगिरी दिसल्यास त्वरित तक्रार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
    पूर्वी ग्रामीण भागात भानामती, अंगात येणे यांसारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर आढळत होत्या. त्या काळात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून लोकजागृती केली. त्यांनी विज्ञाननिष्ठ विचारांचा प्रसार केला आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढा उभारला. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.
आज आपण २१व्या शतकात जगत असलो, तरी भोंदूगिरी संपलेली नाही—ती फक्त स्वरूप बदलून समोर येत आहे. रिमोट कंट्रोलवर चालणारा साप आणि महिलांचे लैंगिक शोषण हे या भोंदूगिरीचे क्रूर वास्तव आहे. “चमत्कार”, लाखो रुपयांना विकली जाणारी साधी वस्तू, “अद्भुत उपाय” यांसारख्या गोष्टी समाजातील अज्ञान आणि अंधविश्वासाचे द्योतक आहेत.
   जेव्हा माणूस स्वतःच्या कष्टांपेक्षा नशिबावर अधिक विश्वास ठेवतो, आणि औषधांपेक्षा अंगारा-धुपाऱ्यावर अवलंबून राहतो, तेव्हा अशा भोंदूगिरी ला खतपाणी मिळते. त्यामुळे अंधश्रद्धा केवळ वैयक्तिक नुकसान करत नाही, तर समाजाच्या प्रगतीलाही अडथळा ठरते.
आज खरी गरज आहे ती वैचारिक स्वच्छतेची. संत गाडगेबाबा यांनी जसा हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ केले, तशीच आज आपल्याला मनातील अंधश्रद्धा दूर करावी लागेल.
खरे संत कधीही चमत्कारांचा दावा करत नाहीत. ते लोकांकडून जबरदस्तीने पैसे घेत नाहीत. ते शिक्षण, स्वच्छता, प्रामाणिकपणा, नैतिकता आणि स्त्रियांच्या सन्मानाचा संदेश देतात. ते लोकांना विचार करायला शिकवतात, अंधानुकरण करायला नाही.
संत बहिणाबाई चौधरी यांच्या ओळी आजही आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतात—
आला सास, गेला सास,
जीवा तुझं हे तंतर
अरे जगणं-मरणं,
एका श्वासाचं अंतर.”
या ओळी जीवनाचे क्षणभंगुर सत्य सांगतात आणि आपल्याला विवेकाने जगण्याची शिकवण देतात.
चला, या संतांच्या भूमीला भोंदूगिरीपासून मुक्त करण्याचा संकल्प करूया.
अंधश्रद्धेऐवजी विज्ञानावर विश्वास ठेवूया.
व्यक्तीपेक्षा सत्याला महत्त्व देऊया.

             दिलीप वैराळ
       रामराव आदिक पब्लिक स्कूल, 
        अशोकनगर
close