shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अभिषेक - मलिंगाचा सनरायझर्सच्या विजयात सिंहाचा वाटा

अभिषेक शर्माच्या स्फोटक फलंदाजीनंतर ईशान मलिंगाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा ४७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत दोन बाद २४२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्लीला २० षटकांत नऊ गडी गमावून केवळ १९५ धावाच करता आल्या. दिल्लीकडून नितीश राणाने सर्वाधिक ५७ धावा केल्या, तर समीर रिझवीने ४१ आणि केएल राहुलने ३७ धावा केल्या.
खराब सुरुवातीनंतर राहुल आणि नितीशची झुंज

हैदराबादविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. दिलशान मदुशंकाने पथुम निस्संकाला बाद करून दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का दिला. निस्संका सहा चेंडूंमध्ये एक षटकार मारून आठ धावांवर बाद झाला. पहिल्या धक्क्यानंतर केएल राहुल आणि नितीश राणा यांनी दिल्लीचा डाव सावरला. नितीश राणाने २७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुल आणि नितीश यांची भागीदारी वाढत असतानाच शकिब हुसेनने केएल राहुलला बाद करून दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का दिला. राहुल आणि नितीशने दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावा जोडल्या. एक चौकार आणि तीन षटकारांसह २३ चेंडूंमध्ये ३७ धावा करून राहुल बाद झाला.

ईशान मलिंगाचा दुहेरी धक्का 
केएल राहुल परतल्यानंतर नितीशलाही क्रीजवर जास्त वेळ टिकता आले नाही. ईशान मलिंगाने नितीश राणाला बाद करून दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का दिला. सात चौकार आणि तीन षटकारांसह ३० चेंडूंमध्ये ५७ धावा करून नितिश बाद झाला. ईशान मलिंगाने सलग दोन चेंडूंवर दोन बळी घेतले. नितीशला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर मलिंगाने डेव्हिड मिलरला शुन्यावरच त्रिफळाचीत केले. मात्र, मलिंगाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली नाही.

स्टब्स-रिझवी भागीदारी
ईशान मलिंगाने ट्रिस्टन स्टब्सला बाद करून दिल्लीला पाचवा धक्का दिला. स्टब्स आणि समीर रिझवी आपल्या मोठ्या फटक्यांनी हैदराबादच्या गोलंदाजांवर सातत्याने दबाव टाकत दिल्लीला सावरत होते. मात्र, मलिंगाने ही भागीदारी तोडली. स्टब्स आणि रिझवीने पाचव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. तीन चौकार आणि एका षटकारासह १६ चेंडूंमध्ये २७ धावा करून स्टब्स बाद झाला. त्यानंतर मलिंगाने संघाचा महत्त्वाचा खेळाडू आशुतोष शर्माला बाद केले, जो दोन चौकारांसह १० चेंडूंमध्ये १४ धावा करून बाद झाला.


अभिषेक - हेडची दमदार सुरुवात 
तत्पूर्वी, अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक आणि ट्रॅव्हिस हेडने हैदराबादसाठी शानदार फलंदाजी करत संघाला एक भक्कम सुरुवात करून दिली. या दोन्ही फलंदाजांची सुरुवात संथ होती, पण तीन षटकांनंतर त्यांनी वेग वाढवला आणि आपल्या क्षमतेनुसार कामगिरी केली. नितीश राणाचा ऑफ-स्पिन आणि लुंगी एनगिडीचे स्लो बॉल्ससुद्धा अभिषेकच्या वादळी खेळीसमोर निष्प्रभ ठरले. दिल्ली कॅपिटल्सची रणनीती पूर्णपणे अयशस्वी ठरली. संघाने पार्ट टाईम फिरकी गोलंदाज राणासोबत डावाची सुरुवात केली. हेड आणि अभिषेकने पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली, जी कर्णधार अक्षरने हेडला बाद करून तोडली. दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २६ चेंडूंमध्ये ३७ धावा करून हेड बाद झाला.

अभिषेकच्या तीन मोठ्या भागीदाऱ्या
अभिषेकने दिल्लीच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला, आपल्या नाबाद १३५ धावांच्या ६८ चेंडूंच्या खेळीत १० षटकार आणि दहा चौकार मारले. त्याने पहिल्या तीन विकेट्ससाठी महत्त्वपूर्ण भागीदारी रचल्या. हेड व्यतिरिक्त, अभिषेकने कर्णधार ईशान किशन (२५) सोबत  दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने हेनरिक क्लासेन (३७) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूंत ६६ धावांची अभेद्य भागीदारी करून संघाला एक मोठी धावसंख्या उभारून दिली. अभिषेक १३५ धावांवर नाबाद राहिला, जी आयपीएलच्या इतिहासातील फलंदाजाची पाचवी सर्वोच्च धावसंख्या आहे. दिल्लीला अक्षरने एकमेव विकेट मिळवून दिली ईशान धावबाद झाला. 

दिल्लीचे गोलंदाज ठरले महागडे 
दिल्लीच्या फिरकी गोलंदाजांनी आठ षटकांत एकूण १०८ धावा दिल्या पॉवरप्लेमध्ये ६७ धावा दिल्यानंतर, सातव्या ते पंधराव्या षटकांदरम्यान ११६ धावा देत  सामन्यावरील नियंत्रण पूर्णपणे गमावले. अभिषेकची ख्याती पाहता हि कामगिरी संथ वाटू शकते, परंतु त्याच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची शॉट निवड आणि टायमिंग. त्याने चेंडू उशिरा खेळला, विशेषतः एन्गिडीविरुद्ध, आणि बहुतेक फटके विकेटसमोर खेळले. त्याने ४७ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले आणि शेवटपर्यंत आक्रमक पवित्रा कायम ठेवला. क्लासेनने, शेवटच्या षटकांमध्ये तीन चौकार आणि तितक्याच षटकारांच्या मदतीने, २८० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा करून संघाला २४० धावांच्या पुढे नेले.

सर्वाधिक धावांचा विक्रम गिलच्याच नावे
प्रत्येक आयपीएल हंगामात, एक फलंदाज आपल्या खेळीने लक्ष वेधून घेतो. आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने २०१३ मध्ये पुणे संघाविरुद्ध आरसीबीकडून खेळताना नाबाद १७५ धावा केल्या होत्या. गेलने असा विक्रम प्रस्थापित केला जो आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. त्यानंतर ब्रेंडन मॅककुलमच्या नाबाद १५८ धावांचा क्रमांक लागतो, ज्याने २००८ मधील पहिल्याच आयपीएल सामन्यात खळबळ उडवून दिली होती. अलिकडच्या वर्षांत, अभिषेक शर्मा एक उदयोन्मुख तारा म्हणून उदयास आला आहे. अभिषेकने २०२५ मध्ये १४१ धावा केल्या, जी आयपीएलच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. चौथ्या क्रमांकावर क्विंटन डी कॉक आहे, ज्याने २०२२ मध्ये नाबाद १४० धावा केल्या होत्या. आता अभिषेकच्या नावावर पाचव्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आहे.

गेल आणि फिंचला मागे टाकले
अभिषेक शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये असा विक्रम प्रस्थापित केला आहे, जो दिग्गज फलंदाजांनाही मागे टाकतो. त्याने एकाच टी२० डावात चार वेळा १३० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, जो पराक्रम त्याच्यापेक्षा जास्त वेळा कोणीही केलेला नाही. या बाबतीत, त्याने टी२० चे दिग्गज ख्रिस गेल आणि ॲरॉन फिंच यांना मागे टाकले आहे, ज्यांनी प्रत्येकी तीन वेळा एका डावात १३० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. इतकेच नाही, तर अभिषेकने टी२० क्रिकेटमध्ये ३५० षटकारांचा टप्पाही गाठला आहे.

@डॉ.दत्ता विघावे               
     क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close