shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईबाबांच्या दर्शनाने मिळते सकारात्मक ऊर्जा – साक्षी धोनी




मुलगी झिवासह शिर्डीत साक्षी धोनी; ७ लाखांची देणगी देत साईचरणी कृतज्ञता व्यक्त

शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या पत्नी साक्षी धोनी यांनी आपल्या कन्या झिवा धोनी सोबत शिर्डीत येत श्री साईबाबांच्या समाधीचे अत्यंत भावपूर्ण वातावरणात मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यान्ह आरतीस उपस्थित राहून साईचरणी लीन होत भक्तीभाव व्यक्त केला.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर तसेच उपकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी साक्षी धोनी यांचा साईबाबांची सुंदर मूर्ती व शाल देऊन सन्मान केला. या प्रसंगी शिर्डी नगरपरिषदेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे सभापती दीपक भैय्या गोंदकर यांचीही उपस्थिती होती.

साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर साक्षी धोनी यांनी द्वारकामाई व गुरुस्थान येथेही जाऊन श्रद्धेने प्रार्थना केली. विशेष म्हणजे, साईबाबा संस्थानच्या वैद्यकीय निधीसाठी त्यांनी तब्बल ७ लाख रुपयांची देणगी देत सामाजिक बांधिलकी जपली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना साक्षी धोनी म्हणाल्या, “मी लहानपणापासून आई-वडिलांसोबत शिर्डीत येत आहे. साईबाबांच्या दर्शनाने मनाला एक वेगळीच शांती आणि समाधान मिळते. माझी मुलगी झिवाला पहिल्यांदाच येथे घेऊन आले असून तिलाही या पवित्र स्थळाचा अनुभव मिळावा, ही माझी इच्छा होती.”

त्या पुढे म्हणाल्या की, “साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा मिळते, जी शब्दांत व्यक्त करता येणार नाही.”

दरम्यान, महेंद्रसिंग धोनी यांना शिर्डीत कधी आणणार, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर साक्षी धोनी यांनी अत्यंत श्रद्धेने उत्तर दिले की, “साईबाबांचे बोलावणे आल्याशिवाय कोणीही येथे येऊ शकत नाही. जेव्हा त्यांचे बोलावणे येईल, तेव्हा आम्ही नक्कीच त्यांना शिर्डीत घेऊन येऊ.”

साक्षी धोनी यांच्या या भेटीमुळे शिर्डीमध्ये भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या साधेपणाने आणि श्रद्धेने सर्वांचे मन जिंकले आहे.
close