रसिख सलाम आणि भुवनेश्वर कुमार यांची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने लखनौ सुपर जायंट्स संघाचा पाच गडी राखून पराभव केला. बुधवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या लखनौ संघाला २० षटकांत १० गडी गमावून केवळ १४६ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने १५.१ षटकांत ५ गडी गमावून १४९ धावा केल्या आणि सामना जिंकला.
आरसीबी 'नंबर १' वर
या विजयासह, आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पाचपैकी चार सामने जिंकून, आरसीबीकडे आठ गुण असून त्यांचा नेट रन रेट +१.५०३ आहे. दरम्यान, लखनौ चार गुणांसह आणि -०.८०४ च्या नेट रन रेटसह सातव्या स्थानावर आहे.
आरसीबीचा डाव
आरसीबीने फिल सॉल्टला (७) अवघ्या १.४ षटकांत नऊ धावांवर गमावले. त्यानंतर विराट कोहलीने देवदत्त पडिक्कलसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३४ चेंडूंमध्ये ५७ धावांची भागीदारी करून डाव सावरला. पडिक्कल ११ चेंडूंमध्ये १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यानंतर कोहलीने डावाची सूत्रे पुन्हा हाती घेतली. कोहलीने ३४ चेंडूंमध्ये एक षटकार आणि सहा चौकारांसह ४९ धावा केल्या. आरसीबीकडून कर्णधार रजत पाटीदारने १३ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या, तर जितेश शर्माने २३ धावा केल्या. आरसीबीने १२२ धावांवर आपली पाचवी विकेट गमावली. त्यानंतर टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी १४ धावांची नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. प्रिन्स यादवने एलसीजी संघाकडून सर्वाधिक तीन बळी घेतले, तर आवेश खानने दोन बळी घेतले.
लखनौचा डाव
यापूर्वी, लखनौच्या डावाची सुरुवात सावधपणे झाली. एडन मार्करम आणि मिचेल मार्श या जोडीने पहिल्या चार षटकांत ३२ धावा जोडून संघाला भक्कम सुरुवात करून दिली. मात्र, वेगवान सुरुवातीनंतर मार्करम केवळ १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार रिषभ पंत क्रीजवर आला, पण दुर्दैवाने, त्याच्या डावातील तिसऱ्याच चेंडूवर तो जखमी झाला आणि त्याला दुखापतग्रस्त होऊन निवृत्त व्हावे लागले. दुसरीकडे, मार्शने सूत्रे हाती घेतली आणि दोन षटकार व तीन चौकारांसह ३२ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या, पण तोही फार काळ टिकू शकला नाही.
मधली फळी पूर्णपणे कोसळली आणि ११८ धावांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांनी पाच गडी गमावले. दरम्यान, पंत पुन्हा फलंदाजीसाठी परतला, पण १६.५ व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने तो फारसे योगदान देऊ शकला नाही. त्याने सहा चेंडूंमध्ये केवळ एक धाव काढली. भुवनेश्वर कुमारने डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि १९ व्या षटकाच्या सलग दोन चेंडूंवर जॉर्ज लिंडे (७) आणि मोहम्मद शमी (०) यांना बाद केले, मात्र त्याची हॅट्रिक हुकली. एलसीजीकडून आयुष बडोनीने २४ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह ३८ धावा केल्या, तर मुकुल चौधरीने २८ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि तीन चौकारांसह ३९ धावांची उपयुक्त खेळी केली.
आरसीबीच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, रसिख सलाम दारने २४ धावांत चार बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या व्यतिरिक्त, भुवनेश्वर कुमारने तीन, तर कृणाल पांड्याने दोन आणि जोश हेझलवूडने एक बळी घेतला.
आरसीबीच्या विजयात गोलंदाजांनी, विशेषतः रसिक सलाम दारने, महत्त्वाची भूमिका बजावली, पण रसिकला सामनावीर पुरस्कार देण्यात आला नाही. या निर्णयावर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बंगळूरुच्या गोलंदाजांची कामगिरी
आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. आरसीबीने एलएसजीला २० षटकांत १४६ धावांवर गुंडाळले. आरसीबीच्या सर्व गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली, पण उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज रसिख सलाम दार सर्वात यशस्वी ठरला. दारने चार षटकांत २४ धावा देऊन चार बळी घेतले. भुवनेश्वर कुमारनेही चार षटकांत २७ धावा देऊन तीन बळी घेतले, कृणाल पांड्याने चार षटकांत ३८ धावा देऊन दोन बळी घेतले आणि जोश हेझलवूडने चार षटकांत २० धावा देऊन एक बळी घेतला. आरसीबीने १५.१ षटकांत पाच गडी गमावून १४९ धावा करत पाच गडी राखून सामना जिंकला.
रसिख ऐवजी हेझलवूडला सामनावीर का घोषित करण्यात आले?
सामन्यानंतर रसिख सलाम दारला सामनावीर पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा होती, पण सर्वांना आश्चर्याचा धक्का देत हा किताब वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला देण्यात आला. हा निर्णय सर्वांच्या आकलनापलीकडचा होता, कारण दारचा इकॉनॉमी रेट चांगला होता आणि त्याने हेझलवूडपेक्षा तीन अधिक बळी घेतले होते. टी-२० क्रिकेटमध्ये या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे, दारला सामनावीर पुरस्कार न देणे हा एक विचित्र निर्णय आहे.
रसिख सलामला डावलणे हा निर्णय एकपक्षी असल्याने त्यावर सर्वच टिका होत आहे. एवढी चांगली कामगिरी करून संघाच्या विजयात मोलाचा व मोठा उचलल्यानंतर त्याला सामनावीर पुरस्कारापासून वंचित ठेवणे म्हणजे त्याचे पुढील स्वप्न ठेचण्यासारखेच म्हणावे. बीसीसीआयने पुरस्कार निवड समितीत खरे अभ्यासू व समजदार लोक निवडण्याची गरज आहे.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

