घरबसल्या महिलांना रोजगाराची संधी देत उभारला स्वावलंबनाचा दीप; पुण्यात मानाचा गौरव
नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर ग्रामीण भागातील महिलांना घरबसल्या रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणाऱ्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोडे गावच्या सुकन्या वैशाली घरटे यांना पुणे येथे प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्राची हिरकणी’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
Kasturi Rise Foundation आयोजित ‘मॉसाहेब-हिरकणी’ गौरव सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे ग्रामीण महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळाली असून, संपूर्ण धुळे जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वैशाली घरटे या सेंद्रिय उत्पादनांच्या व्यवसायातून स्वतः यशस्वी उद्योजिका बनल्या असून, त्यांनी आपल्या टीमच्या माध्यमातून शेकडो महिलांना एकत्र आणत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिला घरची जबाबदारी सांभाळत स्वाभिमानाने उत्पन्न मिळवत आहेत. त्यांनी महिलांना केवळ रोजगारच नाही, तर व्यवसायाचे आधुनिक तंत्र, मार्केटिंग आणि आत्मविश्वासही दिला आहे.
ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या वैशाली घरटे यांनी आपल्या कार्यातून “महिला सक्षमीकरण” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे. त्यांचा प्रवास हा संघर्षातून यशाकडे नेणारा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
“हा सन्मान प्रत्येक कष्टकरी भगिनीचा” – वैशाली घरटे
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावूक होत वैशाली घरटे म्हणाल्या,
"हा सन्मान फक्त माझा नसून माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येक मेहनती महिलेचा आहे. त्या प्रत्येक भगिनीचे स्वप्न पूर्ण होताना पाहणे, हा माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे."
त्यापुढे म्हणाल्या,
"धुळे जिल्ह्यातील एका छोट्या सामोडे गावातून सुरू झालेला हा प्रवास आज इथपर्यंत पोहोचेल, असे कधी वाटले नव्हते. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण महिलांना स्वावलंबी बनवण्याचे स्वप्न कायम डोळ्यासमोर होते. आज माझ्या टीममधील महिला आत्मनिर्भर झालेल्या पाहून समाधान मिळते. हा पुरस्कार मला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा ठरेल."
वैशाली घरटे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत असून, ग्रामीण महिलांसाठी त्या आज एक प्रेरणादायी आदर्श बनल्या आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत असून, “घरबसल्या रोजगार” ही संकल्पना आता वास्तवात उतरली आहे.

