दुसऱ्यांना खाली दाखवून, उंची कधी वाढत नाही,
माणुसकीच्या वाटेवरती, हार कधी लागत नाही।
प्रेम करा, सन्मान द्या, हेच जीवनाचं धन,
चांगुलपणाच्या कर्मांनीच, जिंकू सारे जन॥॥
१
दुसऱ्याला कमी लेखून, वाढत नाही मान,
नम्रपणाच्या सावलीतच, फुलतो खरा स्वाभिमान।
अहंकाराची आग जळे, प्रेमाची पेटवा ज्योत,
दयाळूपणाच्या वाटेवर, मिळतो सुखाचा स्रोत॥॥
२
ढकलून कुणा मागे कधी, पुढे जाता येत नाही,
परहिताची साथ धरुनी, वाट कधी हरवत नाही।
हातामध्ये हात धरू, प्रेमाची बांधू शान,
एकमेकांच्या सुखामध्ये, दडले खरे भगवान॥॥
३
मन दुखवून कधी कुणाचे, आनंद फुलत नाही,
काटे पेरून आयुष्यात, फुलांची बाग येत नाही।
गोड बोलाचा एकच शब्द, लाख मने जिंकून घेई,
करुणेच्या त्या गोड सुरांनी, ईश्वरही धावून येई॥॥
४
अपमानाची बीजे पेरू नको, सन्मानाचे पेर बीज,
कर्मफुलांच्या सुगंधाने, उजळू दे जीवननीज।
वेळ फिरते चक्रासारखी, सत्ता धनही जाई,
चांगुलपणाची ठेवच शेवटी, सोबतीला राही॥॥
५
रूप, पद, पैसा, ताकद, सारे क्षणभंगुर ठरती,
माणुसकीची अमोल दौलत, युगानुयुगेच भरती।
सेवेचीच पूजा करा, प्रेमाचा धरा ध्यास,
याच मार्गाने मिळेल शेवटी, जीवनाला सुवास॥॥
६
अभिमानाचा मुकुट उतरवा, नम्रतेचा धरा हार,
प्रेमामध्येच दडलेला आहे, जगण्याचा खरा आधार।
साई म्हणती कर्म करा रे, ठेवू नका अभिमान,
माणुसकीच्या मंदिरामध्ये, वसे खरा भगवान॥॥
दुसऱ्यांना उचलून धरा, हीच खरी श्रीमंती,
प्रेम, दया, सेवा, नम्रता, हीच जीवनाची संपत्ती।
जन्म मिळाला मानवाचा, करा त्याचा सन्मान,
चांगुलपणाच्या गाण्यानेच, उजळेल हिंदुस्थान॥॥
प्रस्तुती:शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह म्युझिक टिम अहिल्यानगर
गितकार :रमेश जेठे सर जिल्हा अहिल्यानगर

