shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कळसच्या आल्हाट बंधूंची उत्तुंग भरारी! विशाल आल्हाटची एमपीएससी परीक्षेत बाजी,

​अकोले (प्रतिनिधी):
अकोले तालुक्यातील कळस गावचा भूमिपुत्र विशाल प्रकाश आल्हाट याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे त्याचा मोठा भाऊ विक्रांत आल्हाट हादेखील नुकताच पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर रुजू झाला आहे. अत्यंत हलाखीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीतून दोन्ही भावांनी मिळवलेल्या या उत्तुंग यशामुळे कळस गावच्या मानात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दोन्ही भावांच्या या दैदिप्यमान यशाची नोंद घेत कळस ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे आणि जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या शुभहस्ते विशाल आल्हाट व त्यांच्या पालकांचा विशेष सन्मान करण्यात आला. 
आल्हाट कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील प्रकाश आल्हाट हे माध्यमिक शाळेत प्रयोगशाळा परिचर (लॅब अटेंडंट) म्हणून कार्यरत होते, तर आई मंदा आल्हाट या एसटी महामंडळाच्या अकोले आगारात वाहक (कंडक्टर) म्हणून सेवा बजावत आहेत. आई-वडिलांनी कष्ट उपसून मुलांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. पालकांच्या याच कष्टाचे चीज करत दोन्ही भावांनी प्रशासकीय सेवेत उच्च पद मिळवून दाखवले.
विशाल याचे प्राथमिक शिक्षण कळस येथील प्राथमिक शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण कळसेश्वर विद्यालयात पूर्ण झाले. गावातीलच शाळेत शिक्षणाचा पायंडा रचून त्याने एमपीएससीसारख्या कठीण परीक्षेत हे यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील मुलांसाठी विशाल आणि विक्रांत यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरत असून, सर्व स्तरांतून या आल्हाट बंधूंचे आणि त्यांच्या कष्टकरी पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे.
close