shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवस्थान इनाम वर्ग-३ जमिनींच्या प्रकरणांचा निकाल रखडला..,गायके यांचा आरोप..!!

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊनही वर्षभरापासून निर्णयाची प्रतीक्षा; चौकशीला दिरंगाई होत असल्याचा तक्रारदाराचा आरोप

अहिल्यानगर | प्रतिनिधी

देवस्थान इनाम वर्ग-३ जमिनींच्या फेरबदल, अतिक्रमण, कथित बेकायदा बिगरशेती वापर, दस्तनोंदणी तसेच जमीन व्यवहारांबाबत गंभीर तक्रारी करण्यात आल्या असून, संबंधित प्रकरणांमध्ये सुनावणी पूर्ण होऊनही अद्याप अंतिम निकाल मिळालेला नसल्याची तक्रार अर्जदार काकापाटील बाजीराव गायके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या प्रकरणांची तातडीने चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी आणि प्रलंबित निकाल देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


गायके यांनी मुख्यमंत्री कार्यालयास सादर केलेल्या निवेदनानुसार, मौजे भेंडा बु., ता. नेवासा येथील गट क्रमांक ३०६, ३०७ व १ या नागाबाबा देवस्थान इनाम वर्ग-३ जमिनींबाबत फेरबदल, अतिक्रमण, कथित बेकायदा बिगरशेती वापर व दस्तनोंदणी तसेच भेंडा सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कथित भाडेकराराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
              तसेच भेंडा बु. येथील सर्व्हे क्रमांक ८६, २०७ व गट क्रमांक १७८ ही श्रीराम मंदिर देवस्थान इनाम वर्ग-३ जमीन असल्याचा दावा करत, सदर जमिनीच्या कथित खरेदी-विक्री, अतिक्रमण व व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात संबंधित जमीन देणारे व घेणारे यांच्यावरही नियमानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

मस्जिद इनाम जमिनीबाबतही प्रश्नचिन्ह
भेंडा येथील गट क्रमांक ३३४१, ३३४ ब व ३३३ या जमिनीबाबतही तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या जमिनीच्या वक्फ बोर्डाशी संबंधित कथित कागदपत्रांबाबत तसेच जमीन मालकी व व्यवहाराबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित कागदपत्रांची सत्यता तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी भूमिका तक्रारदाराने मांडली आहे.

२७ जून २०२५ रोजी सुनावणी पूर्ण; निकालाची प्रतीक्षा
अर्जातील माहितीनुसार, वरील तीन प्रकरणांमध्ये मा. अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयासमोर सुनावणी घेण्यात आली असून संबंधित पक्षांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. २७ जून २०२५ रोजी या तीनही प्रकरणांच्या फाईल बंद करण्यात आल्याचा दावा अर्जदाराने केला आहे.
          मात्र, सुनावणी पूर्ण होऊन फाईल बंद झाल्यानंतरही अंतिम निकाल अद्याप मिळालेला नसल्याने तक्रारदाराने नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या नियमानुसार निर्धारित कालावधीत निकाल देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 इतर देवस्थान जमिनींच्या चौकशीचीही मागणी
केवळ भेंडा परिसरापुरते हे प्रकरण मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील इतर देवस्थान इनाम वर्ग-३ जमिनींचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.दैत्य निंबानांदूर, ता. पाथर्डी येथील विठोबा देवस्थान इनाम वर्ग-३ जमीन, सोनई, ता. नेवासा येथील नरसिंह व रामचंद्र देवस्थान इनाम वर्ग-३ जमीन तसेच शेवगाव येथील राममंदिर इनाम वर्ग-३ गट क्रमांक १३१३, १३१४ व १३१५ या जमिनींबाबत अतिक्रमण व कथित बेकायदा बांधकामांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कुळ कायदा यंत्रणेच्या भूमिकेवरही सवाल
या प्रकरणांमध्ये संबंधित तहसीलदार व कार्यालयीन स्तरावरील कर्मचाऱ्यांकडून चौकशी व अहवाल देण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
            देवस्थान इनाम जमिनींच्या मालकी, वापर, अतिक्रमण आणि कथित बेकायदा व्यवहारांशी संबंधित तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि प्रलंबित प्रकरणांमध्ये कायद्यानुसार तातडीने निर्णय द्यावा, अशी मागणी काकापाटील बाजीराव गायके यांनी केली आहे.
          या संदर्भातील निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी अहिल्यानगर, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, विभागीय आयुक्त नाशिक तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनाही देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

(ता. १६ सप्टेंबर २०२६ रोजीचे काका पाटील गायके यांचे निवेदन)
close