shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काळेवाडी नं. १ शाळेत वाचन प्रेरणा दिन हात धुणे दिन उत्साहात साजरा**डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा ; जागतिक हात धुण्याच्या योग्य पद्धतीतून आरोग्याचा संदेश*

*काळेवाडी नं. १ शाळेत वाचन प्रेरणा दिन हात धुणे दिन उत्साहात साजरा*
*डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा ; जागतिक हात धुण्याच्या योग्य पद्धतीतून आरोग्याचा संदेश*
इंदापूर: जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी नं. १ येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन तसेच जागतिक हात धुणे दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि स्वच्छतेच्या सवयी रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन उपक्रमशील शिक्षिका कांचन रणपिसे मॅडम व मुख्याध्यापक प्रताप शिरसट यांनी केले. यावेळी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास, विज्ञान क्षेत्रातील योगदान, देशासाठी केलेले महान कार्य आणि विद्यार्थ्यांविषयी असलेली त्यांची आत्मीयता यांची माहिती देण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, मेहनत आणि ज्ञानाच्या बळावर यश मिळवता येते, हे त्यांच्या जीवनप्रवासातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच वाचनाचे महत्त्व, मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
जागतिक हात धुणे दिनानिमित्त शिक्षिका कांचन रणपिसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्त्व आणि हात धुण्याची योग्य पद्धत समजावून सांगितली. हातांवर असणारे रोगजंतू दूर करण्यासाठी साबण आणि स्वच्छ पाण्याने किमान २० सेकंद हात धुणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर आणि खेळून आल्यानंतर हात धुण्याची सवय लावावी, असे आवाहन करण्यात आले. नियमित हात धुतल्यामुळे जुलाब व इतर संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते, तर अस्वच्छ हातांमुळे रोगजंतू शरीरात प्रवेश करून आजार पसरू शकतात, याबाबतही विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.
या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका संगीता चव्हाण मॅडम व मदतनीस मीराबाई नाईकवाडी मॅडम उपस्थित होत्या.
वाचनातून ज्ञान, विचारांतून प्रेरणा आणि स्वच्छतेतून निरोगी जीवन हा संदेश देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी नं. १ येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुणे दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
close