वीर वडार एकता फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी; विजय दादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच भूमिपूजन सोहळा!
शिर्डी | प्रतिनिधी – शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह
वडार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी शिर्डी येथे भव्य वडार भवन उभारण्याच्या संकल्पनेला आता गती मिळाली आहे. वीर वडार एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विजय दादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी पदाधिकाऱ्यांनी शिर्डी येथे प्रत्यक्ष जागेची पाहणी करून स्थानिक वडार बांधवांशी सविस्तर चर्चा केली.
फाउंडेशनचे अहिल्यानगर उत्तर जिल्हा संपर्कप्रमुख तथा कल्याण जिल्हाध्यक्ष मा. रामू दादा देवकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत प्रस्तावित वडार भवनाच्या जागेची पाहणी केली. यावेळी समाजबांधवांच्या अपेक्षा, भवनाची आवश्यकता आणि पुढील नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
विजय दादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच भूमिपूजन!
वडार समाजाला हक्काचे व्यासपीठ मिळावे, सामाजिक उपक्रम, विद्यार्थी मार्गदर्शन, समाजप्रबोधन तसेच विविध कार्यक्रमांसाठी स्वतंत्र वास्तू उपलब्ध व्हावी, या उद्देशाने वडार भवन उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्ष विजय दादा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रामू दादा देवकर व त्यांची टीम लवकरच शिर्डी येथे वडार भवनाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
जागेच्या पाहणीसाठी मान्यवरांची उपस्थिती
या पाहणीप्रसंगी राज्य कोअर कमिटीचे मा. संदीप भाऊ कुसळकर, अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष संपतराव गायकवाड, दिपेश पिटेकर, प्रदीप मोहिते, पोपट पवार, दीपक कुराडे, रमेश कुराडे, सोमनाथ जाधव, शंकर कुराडे, संतोष कुराडे, जाधव यांच्यासह अनेक वडार समाजबांधव उपस्थित होते.
शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्रात वडार समाजाचे स्वतंत्र भवन उभे राहणे ही समाजाच्या संघटनात्मक वाटचालीतील महत्त्वाची बाब ठरणार आहे. या उपक्रमासाठी सर्व समाजबांधवांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.
एकच ध्येय, सक्षम बनू, समाज घडवू!
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा
सत्य, निर्भीड व जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारी एकमेव वृत्तसेवा!

