शेवगाव आणि पाथर्डी शहर तसेच तालुक्यातील विविध भागांत काल अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी गारपिटही झाली. या आस्मानी संकटात गहू, हरभरा, ज्वारीसह आंबा आणि संत्रा फळपिकांचे नुकसान झाले आहे.
या पावसाचा फटका खळ्यात मळ्यात उघड्यावर काढून ठेवलेला गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांना बसला. हे पीक झाकण्यासाठी शेतकर्यांची तारांबळ उडाली. या नवीन संकटामुळे शेतकरी हबकून गेला आहे.
नगर शहर, भिंगार, देहरे, वांबोरी, नागरदेवळे यासह अन्य ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त आहे. त्यात गहू पिकाला फटका बसला.खरवंडी कासार वार्ताहराने कळविले की,- पाथर्डी शहरासह तालुक्यात झालेल्या रविवारच्या दुपारच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रविवारी दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह सुसाट वार्याने आलेल्या गारा व पावसाने शेतकर्यांचे गहू, फळझाडे, कांदा, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरात सलग दुसर्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून रविवार रोजी सायंकाळी चार वाजता आलेल्या सोसाट्याच्या वार्याबरोबर तब्बल दीड तास तळ ठोकला. या दरम्यान गाराही कोसळल्या. त्यात गहू, ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान झाले.
शिर्ड एक्सप्रेस वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा shirdiexpress7273@gmail.com वर

