मुख्यमंत्री महोदयांचे हार्दिक आभार..
देवळाली प्रवरा - दि. २३ मार्च २०२०
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांना राज्यातील कृषी सेवा केंद्र चालू ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष व समन्वय समितीच्या वतीने आज दि. २३ रोजी दुपारी १२ वाजता ई- मेल द्वारे विनंती केली असता राज्यातील शेतकऱ्यांसाठी केवळ चार तासात निर्णय घेऊन दुपारी चार नंतर शेतीशी निगडित दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय घोषित करून राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यास तत्पर असल्याचे दाखवून दिले बद्दल समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले.
अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, उपाध्यक्ष डॉ विलास पाटील, सचिव किशोर थोरात, कोशाध्यक्ष रामभाऊ काळे आदीं पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दुपारी १२ वाजता आप्पासाहेब ढुस यांनी इ-मेल द्वारे पत्र देऊन कृषी निविष्ठा अत्यावश्यक सेवेत समावेश करणे बाबत लिहिलेल्या विनंती पत्रात म्हंटले होते की,
शेतीला भारतीय अर्थव्यस्थेचा कणा समजल्या जाते, आज शेतकरी राजा अडचणीत आहे, त्याला रासायनिक खते, बी बियाणे, कीटक नाशके भेटणे मुश्किल झाले आहे. सध्या शेतात रब्बी पिके उभी आहेत, त्यावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कांदा पिकांना शेवटचा फवारा घेणे गरजेचे आहे. नाहीतर पीक हातचे जाणार आहे. डाळिंब, द्राक्ष, व इतर फळ पीक बागायतदार शेतकऱ्यांना कीटकनाशके मिळत नसलेने ते हतबल झाले आहेत. ऊस पिकाला रासायनिक खतांच्या मात्रा गरजेच्या आहेत, शेतातील सर्व कामे थांबलेने हातावर पोट असलेल्या शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या सर्व बाबींचा राज्याच्या शेती उत्पन्नावर परिणाम होऊन साहजिकच शेतकरी राजा कर्जबाजारी होणार आहे. परिणामी राज्यातील शेतकरी आत्महत्या वाढतील, शेतकऱ्यांना इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे, राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद असल्याने शेतकरी व मजुरांवर मोठे संकट ओढवले आहे. बहुतेक कृषि सेवा केंद्र चालक हे सेटकर्यांचीच मुले असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
सबब राज्य सरकारने कृषि निविष्ठा अत्यावश्यक सेवेत टाकून राज्यातील कृषी सेवा केंद्र चालू ठेवण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत व राज्यातील शेतकरी राजाला दिलासा द्यावा अशी विनंती या पत्रात केली होती.
ई मेल द्वारे दुपारी बारा वाजता केलेली विनंती चार तासात मान्य करून कृषी पूरक दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केला. राज्यातील कृषी सेवा केंद्र चालू ठेवून शेतकरी व शेतमजूर यांना दिलासा दिल्या बद्दल महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष व समन्वय समितीच्या सर्व सदस्यांनी आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले.


