अहमदनगर, दि. 23 -
सर्व बॅंका, पतसंस्थांनी दि. 31 मार्च 2020 पर्यत फक्त रोख भरणा करणे व काढणे ही दोनच कामे प्राधान्याने करावीत. या कामासाठी बँकानी पुरेशे कर्मचारी नेमावेत. जेणेकरुन ग्राहकांना बॅकेच्या शाखेमध्ये कमीत कमी वेळ व्यतीत करता येईल. बँकानी एक वेळेस जास्तीत जास्त 4 ते 5 ग्राहकांना शाखेमध्ये येण्यास परवानगी द्यावी व प्रवेश केलेल्या ग्राहकांचे काम झाल्याशिवाय पुढील ग्राहकांना बॅकेमध्ये परवानगी देण्यात येऊ नये. दोन ग्राहकांमध्ये रांगेत एक मीटर इतके अंतर ठेवावे. सर्व बँकांनी आपआपल्या ग्राहकांना इतर वितरण पर्यायांचा म्हणजेच इंटरनेट बॅकींग , मोबाईल बँकीग व युपीआर एटीएम कॅश डिपॉजीट मशीन इत्यादी सुविधांचा वापर करण्यासाठी जागृती करण्यात यावी. बॅकेत ग्राहकांना कांऊटरपासून एक मीटर अंतर ठेवण्याबाबत सुचित करावे व सर्व बँकांनी आपआपले एटीएम कॅश चेक डिपॉजीट पासबुक प्रिंटींग इ सेवा असणा-या मशीनची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच सर्व कर्मचा-यांना व ग्राहकांना सॅनीटायझर, साबण व पाण्याने हात स्वच्छ धुण्यासाठी व्यवस्था करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.
कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला असून त्या कायद्यामधील खंड 2,3 व 4 च्या तरतुदीनुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यकक्षेत्रात कोरोना विषाणूवर ( कोव्हीड 19) नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययेाजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरुन हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचे प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस / इसमास त्याच्या संपर्कात आलेने होण्याची शक्यता विचारात घेता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना एक भाग म्हणून अहमदनगर जिल्हयातील सर्व बँका पतसंस्था यांना हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.


