अहमदनगर, दि. २३ -
अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत तसेच अहमदनगर छावणी परिषद हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास आज सायंकाळी (दि. 23 मार्च 2020) पाच वाजेपासून ते दि.31 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई करण्यात आली आहे. जिल्हादंड़ाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव, उरुस, जत्रा मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रिडा व इतर सर्व स्पर्धा इत्यादींना मनाई राहील. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारचे कृत्य जसे कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणुक, मेळावे, सभा, आंदोलने, देशांतर्गत व विदेशी सहली इत्यादींचे आयोजन करण्यास मनाई राहील. कार्यक्षेत्रात असणारी दुकाने, सेवा आस्थापना, उपहारगृह, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपरमार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब पब क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायाम शाळा, संग्रहालय बंद राहतील. सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्यास मनाई राहील.
हा आदेश खालील बाबतीत लागु होणार नाही. यांत शासकिय, निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम/ आस्थापना. अत्यावश्यक सेवा मधील व्यक्ती, रुग्णालय पॅथॉलॉजी, लॅबोरेटरी, दवाखाने रेल्वे स्टेशन,एस.टी.स्टॅंड, बस धांबे व स्थानके, विमानतळ, रिक्षा थांबे, बँक अत्यंविधी (गर्दी टाळून) अत्यावश्यक किराणा सामान, दूध, दूरधोत्पादने, फळे व भाजी-पाला, औषधालय, पेट्रोल पंप, जिवानावश्यक वस्तु, विक्री/ वितरीत करण्यास परवानगी राहील. (गर्दी टाळून) प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे देनिक) नियतकालिके, टि व्ही. न्युज चेंनेल इत्यादींचे कार्यालय आणि दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविणार्या आस्थापना.


