shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऑलिम्पिक पुढे ढकलल्याने निर्माण झालेत अनेक नवे प्रश्न


टोकियो :-
कोरोनाने अखेर ऑलिम्पिक सामनेसुध्दा पुढे ढकलण्याचे ऐतिहासिक काम करुन दाखविले. आता 2021 मध्ये टोकियो 2020 ऑलिम्पिक सामने होणार आहेत पण हे तितके सोपे आहे का? आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमात यंदा न झालेल्या आणि पुढे ढकललेल्या स्पर्धांनी गुंतागुंत अधिकच वाढवली आहे. ऑलिम्पिक पुढे ढकलल्याने एक प्रश्न सुटला असला तरी नवे कितीतरी प्रश्न तयार झाले आहेत. त्यात आर्थिक गणित बिघडण्यासोबतच स्पर्धांचे वेळापत्रक, मैदानांची उपलब्धता आणि क्रीडानगरीची निगा अशी नवी आव्हाने आता टोकियो 2020 च्या आयोजकांसमोर आहेत. हे या शनिवारचा फूटबॉलचा सामना पुढल्या शनिवारी खेळण्यइतके सोपे नाही असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी)चे अध्यक्ष थॉमस बाक यांनी म्हटले आहे.

ऑलिम्पिक हे दर चार वर्षांनी होत असतात. त्यामुळे या चक्रातील हा बदल म्हणजे तुम्ही एखाद्या दिवशी सकाळी उठलात आणि सूर्य वेगळ्याच ठिकाणी बघायला मिळाला तर…तसा आहे. आता अशा बदलाचे परिणाम तर होणारच. पहिले आव्हान असेल ते आता ऑलिम्पिकसारख्या सर्वात मोठ्या क्रीडा महोत्सवाच्या वेळापत्रकाचे. कारण कोरोनामुळे आधीच काही महत्त्वाच्या स्पर्धा 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेळाडू, प्रशासक व समालोचकांच्या प्रवासाची आणि निवासाव्यवस्थेचीही समस्या येणार आहे.




6 ते 15 आगस्ट 2021 दरम्यान अथलेटिक्सची विश्व अजिंक्यपद स्पर्धा होणार होती पण आता आलिम्पिकसाठी या वेळापत्रकात बदल करण्याची तयारी आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स महासंघाने दाखवली आहे त्यामुळे एक समस्या कमी झाली आहे. जलतरणाची जागतिक अजिंक्यपद स्पर्धासुध्दा जपानमध्येच 2021 च्या 16 जुलै ते 1 आगस्टदरम्यान नियोजित आहे. याशिवाय फुटबॉलची युरो 2020 स्पर्धा आणि कोपा अमेरिका स्पर्धासुध्दा 2021 मध्येच होणार असून जून व जुलैमध्ये त्यांचे सामने आहेत. त्यामुळे 2021 मध्येच आता आलिम्पिकचे वेळापत्रक कसे बसवायचे हा मोठाच प्रश्न आहे. अॉलिम्पिक इतिहासातील सर्वात यशस्वी अथलीट कार्ल लुईस याने 2022 च्या हिवाळी आलिम्पिक सोबतच टोकियो 2020 घ्यावे असे सुचवले आहे ते अधिक संयुक्तिक वाटते.

याशिवाय आलिम्पिक स्पर्धांसाठीची काही ठिकाणे 2021 मध्येसुध्दा उपलब्ध होतील का, हीसुध्दा समस्या आहे. टोकियो 2020 च्या स्पर्धा 43 ठिकाणी होणार आहेत. यापैकी काही ठिकाणे तात्पुरती, काही हेतूपूर्वक बनवलेली आहेत. नव्याने बांधलेल्या 68 हजार प्रेक्षक क्षमतेच्या मुख्य आलिम्पिक स्टेडियमध्ये टोकियो 2020 नंतर विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन होते. ते आता बदलावे लागणार आहे. सामन्यांसाठी येणारे पत्रकार व अधिकाऱ्यांच्या निवासव्यवस्थेचाही प्रश्न येणार आहे. त्यासाठी बूक केलेले टोकियोचे बिग साईट एक्झिबिशन सेंटर तेंव्हा उपलब्ध राहिल का हा आता प्रश्न आहे.

टोकियो बे आणि रेनबो ब्रिजदरम्यान उभारण्यात आलेल्या क्रीडानगरीची देखभाल हे आणखी एक वाढलेले काम असेल. या क्रीडानगरीत 18 हजार लोकांची 21 इमारतींमध्ये व्यवस्था करण्याचे नियोजन होते आणि सामन्यांनंतर या इमारती अलिशान फ्लटमध्ये रुपांतरीत करुन विकण्याचे वा भाड्याने देण्याचे नियोजन होते. यापैकी सुमारे एक हजार फ्लट 2019 मध्येच बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात आले होते. आता त्यांचा ताबा देणे आणि त्यांचे पुर्नर्निमाण हे पुन्हा लांबणीवर पडणार आहे. निवासव्यवस्थेसाठी हॉटेल बुकिंगही मोठीच डोकेदुखी ठरणार आहे. आता 2020 च्या दृष्टीने खूप आधीपासून नियोजन झालेले होते. हॉटेल्स कमी पडताहेत म्हणून बंदरात जहाजांचीही व्यवस्था झालेली होती पण आता वर्षभरापेक्षाही कमी काळात पुन्हा नव्याने ही व्यवस्था करावी लागणार आहे.
close