संचारबंदीमुळे पुण्यात अडकून पडलेल्या मुलांच्या आईवर केले लातुरात उपचार
लातूर | प्रतिनिधी |
कोरोना विषाणू प्रतिबंध करण्यासाठी लागू झालेल्या संचार बंदीमुळे पुण्यात अडकून पडलेल्या दोन मुलांनी थेट लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याशी संपर्क साधून आपली आई शिरूर आनंतपाळ तालुक्यातील येरोळ या गावी आजारी असल्याचे कळवल्याने पालकमंत्र्यांनीही आपल्या जबाबदारीला जागत अँब्युलन्ससह वैद्यकीय पथक पाठवून त्या रुग्ण महिलेवर तातडीने तेथेच उपचार केले आहेत.
या संदर्भातील अधिक माहिती अशी की, शिरूरआनंतपाळ तालुक्यातील येरोळ गावचे रहिवाशी नरसिंग लोंढे यांच्या पत्नी सौ.जमुनाबाई लोंढे या आजारी आहेत, त्यांची माधव व उद्धव ही दोन्ही मुले नोकरी निमित्त पुणे येथे राहतात. नरसिंग लोंढे यांनी आपली पत्नी आजारी असल्याचे पुणे येथे स्थायिक असलेल्या मुलांना सोमवारी कळवले. आई आजारी असल्याचे समजल्यानंतर दोन्ही मुले तातडीने पुण्यावरून लातूरला निघाले, मात्र कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे त्यांना पुण्यातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. आईच्या एकंदर परिस्थितीच्या काळजीने व्याकुळ झालेल्या या दोन्ही मुलांनी दूरध्वनीवरून लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याशी थेट संपर्क करून संवाद साधला, आपली अडचण व आईच्या आजार पणाबद्दल त्यांना विस्तृत माहिती दिली. पालकमंत्री देशमुख यांनी त्यांना धीर देत तुम्ही सुरक्षित रहा, आईची काळजी करू नका त्यांच्यावर योग्य उपचार होतील,असे सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी तात्काळ लातूर येथील शासकीय आरोग्य यंत्रणा व डॉक्टरांशी संपर्क करून या संदर्भातील माहिती दिली व सदर महिलेवर आवश्यक ते सर्व उपचार करण्याच्या सूचना दिल्या .
पालकमंत्र्यांकडून सूचना मिळाल्यानंतर सोमवारी रात्री डॉ. अभिषेक वाघमारे वैद्यकीय पथकासह अंबुलन्सद्वारे येरोळ या गावी तातडीने पोहोचले व सौ. जमुनाबाई लोंढे यांची तपासणी केली , त्यांच्यावर तेथेच उपचार केले. मुलांच्या काळजीमुळे त्यांचा आजार वाढला होता परंतू औषधोपचार झाल्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.
आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले आहे. या संपूर्ण घडामोडी ची माहिती कळल्यानंतर सदरील महिलेच्या दोन्ही मुलांनी पालकमंत्री देशमुख यांनी खऱ्या अर्थाने पालकाची भूमिका निभावत आहेत असे सांगून त्यांचे आभार मानले आहेत.


