- "एक मदतीचा हात" देहरे करांचा आदर्शवत स्तुत्य उपक्रम
देहरे | प्रतिनिधी | (सागर उ. धनवटे):
नगर - मनमाड रोडवर असलेल्या अहमदनगर तालुका व जिल्हा असलेले देहरे हे गाव राजकारणात अति संवेदनशील गाव म्हणून प्रसिध्द आहे. परंतू देशातील वर्तमान स्थितीचे गांभीर्य वेळीच लक्षात घेऊन गावातील सर्व तरुण युवक,युवतींनी व समस्त ग्रामस्थांनी "कोरोना व्हायरस" आजाराचा सामना करण्यासाठी एकीचा यल्गार पुकारला आहे.
सध्या जगभर फोफावलेल्या आणि आपल्या भारत देशासह आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये थैमान घातलेला आहे असा आजार म्हणजे कोरोना (कोविड-19). कोरोना व्हायरस मुळे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी इतर देशातील या आजाराचा हाहाकार पाहुन ती परिस्थिती आपल्या देशात निर्माण होऊ नये म्हणून कोरोना आजाराशी लढा देण्यासाठी योग्य पावले उचलून नाइलाजास्तव संपुर्ण भारत देशात जनतेच्या सहकार्याने 21 दिवसांचे लॉक डाऊन जाहीर केलेले आहे. त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे, त्यामध्ये काही कुटुंब असे आहेत की जे कुटुंब दररोज कुठं तरी काम करूनच आपले उदरनिर्वाह, रोजी रोटी ही भागवत असतात परंतू अशा अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्या लोकांनी अशावेळी काय करायचं..?? त्यांना अशावेळी अडचण निर्माण झाल्यास त्यांनी काय करायचं ?? हा प्रश्न काही ग्रामस्थांसह,तरुण युवकांना सतत भेडसावत असल्यामुळे सर्वांच्या सहकार्याने या गोर-गरिब लोकांना जीवनावश्यक वस्तु घरपोहोच देण्यासाठी व त्यांच्या असलेल्या समस्या सोडविण्यासाठी " एक मदतीचा हात " हि संकल्पना राबविण्यात येत आहे.
( कोरोनावर मात करण्यासाठी राबविलेला हा फवारणी उपक्रम देहरे ग्रामपंचायत, देहरे सैनिक अॅकॅडमी , देहरे ग्रामविकास अधिकारी जाधव मॅडम, पं.स.सदस्य व्हि. डी काळे,सरपंच किसन धनवटे, उप सरपंच अनिल करंडे, मेजर संतोष काळे, "आजी-माजी सैनिक संघटना, देहरे," " देहरे सैनिक अॅकॅडमी, देहरे,"सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काग्रेसचे उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने राबविण्यात आले.)शासनाच्या योजना यथावकाश सुरु होतील तोपर्यंत अशा लोकांसाठी आपण काही तरी देणं लागतो या उदात्त हेतूने त्यांच्या साठी दानशुर लोकांकडून त्यांचा या कठिण प्रसंगात उदर निर्वाह चालवण्यासाठी त्यांना दररोज लागणारे किमान साहित्य त्यामध्ये गहू,तांदूळ साखर,बाजरी, किराणा माल, अश्या अनेक गोष्टी आपण त्यांना मानवता धर्म जपून देऊ केल्या पाहिजे म्हणून देहरे गावातील दानशुर व्यक्ती कडून अश्या लोकांसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. ही बाब अतिशय स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे.
कारण कोरोना आजाराची ही परिस्थिती पुढेही गंभीर होण्याचे संकेत दिसत असल्या कारणाने आपण आताच त्या दृष्टीने महत्वाचे पाऊले उचलली पाहिजे .या उदात्त हेतूने देहरे सैनिक अकॅडमी तसेच देहरे आजी-माजी सैनिक संघटना गावातील विविध सामाजिक संघटना,संस्था,मित्रमंडळ,दानशुर व्यक्ती यांच्या सहकार्याने हे कार्य सुरू झालेले आहे, या आजाराचे गांभीर्य ओळखून अनेकांनी गहु ,बाजरी ,तांदूळ व किराणा मालासाठी मोठ्यामनाने एक देशसेवा म्हणून आर्थिक मदतही मोठ्या प्रमाणात देऊ केली आहे . यापुढे ज्यांना मदतीचा हात द्यायचा आहे त्यांनी "देहरे सैनिक अॅकेडमी तसेच देहरे आजी-माजी सैनिक संघटना " यांचेशी त्वरीत संपर्क करून गहु,बाजरी,तांदूळ, किराणा माल अशा स्वरुपात देऊन सहकार्य करावे असे नम्र आवाहन देखील करण्यात आले आहे.
माननीय पंतप्रधानांनी आवाहन केल्याप्रमाणे आपण सर्वांनी घरातच राहिले पाहिजे,कुटूबियांची काळजी घेतली पाहिजे आणि ह्या कोरोना व्हायरस पासून आपण आपली आणि देशाची सुटका करून घेतली पाहिजे. अशा प्रकारे गावात सामुहिक औषध फवारणी असो,रक्तदान शिबीर असो,गोर गरिबांचे समस्या असो , वृध्दांचे समस्या असो, नोकरी समस्या असो वा अन्य काहिही असो सदैव संकटकाळी संकटमोचक म्हणून हे गाव अग्रेसर असतेच परंतू या गावातील स्तुत्य उपक्रम राबवण्यात आणखी एक पाऊल पुढे असणारे " देहरे सैनिक अॅकॅडमी " व " देहरे आजी-माजी सैनिक संघटना " या सततच्या आदर्शवत कार्यक्रमामुळे कौतुकास पात्र ठरले आहे.


