इंदापूर ,प्रतिनिधी :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमूळे हातावर पोट असणाऱ्या करोडो कुटुंबांवर अक्षरश उपासमारीची वेळ आली आहे. तर कोरोनाची भीती आणि ठेकेदारांनी झटकलेल्या जबाबदारीमुळे मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना मुंबई, पुण्यासारखी शहरे पायपीट करत सोडून जाण्याबरोबरच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर पोलीस प्रशासनावर देखील अतिरिक्त ताण पडत आहे.
रोजंदारीवर काम करून मोबदल्यात मिळणारी तोकडी मजुरी हाच जगण्याचा एकमेव मार्ग असणाऱ्या कुटुंबांतील सदस्यांचा जीव कोरोनामुळे जाओ न जाओ मात्र उपासमारीने नक्कीच जाईल अशी परिस्थिती सध्या पूर्ण देशभर निर्माण झाली आहे. अशातच अनेक सामाजिक संघटना या लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. इंदापूर शहरातील अशीच एक इस्लामच्या जकात या संकल्पनेवर आधारित “जकात फाऊंडेशन” ही सामाजिक संघटना या कुटुंबांच्या मदतीसाठी धावून आली आहे. या संघटनेने इंदापूर शहर आणि त्यालगतच्या मजूर, विधवा, अनाथ, भटक्या विमुक्त जाती जमाती आणि पर राज्यातील नागरिकांना तसेच अनेक गरजवंत कुटुंबांना मदतीचा हात देत धान्य वितरित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तर मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यांबरोबरच कर्नाटक, आंध्रा, तामिळनाडू, तेलंगणा अशा अनेक राज्यांतून रोजगारासाठी गेलेल्या नागरिकांनाही कोरोना आणि उपासमारीच्या भीतीने प्रवासाची कोणतीही साधने नसतानाही भर उन्हात ही शहरे सोडण्यास भाग पाडले आहे. लॉक डाऊनमुळे रस्त्यालगतची सर्व दुकाने, हॉटेल्स देखील बंद आहेत, गावच्या गावं ओस पडली आहेत आणि अशातच रस्त्यालगतच्या गावातील नागरिकांनीही कोरोनाची लागण होण्याच्या भीतीने यांना अन्न पाणी देण्याचे टाळल्याने अशा लोकांना भलताच त्रास सहन करावा लागत आहे. ना वाहने, ना हॉटेल्स, ना जेवणाची सोय, ना पाण्याची. मात्र “जकात फाऊंडेशनने” अशा लोकांनाही मदतीचा हात देत पाणी, जेवण, फळे, चहा, बिस्कीट देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. सोबतच राज्यात संचारबंदी आणि जिल्हाबंदी असल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलीस बांधवांवर आल्याने जागोजागी तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारून चोवीस तास खडा पहारा देणाऱ्या पोलिसांनाही चहा, पाणी, नाष्टा अशा छोट्या छोट्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र “जकात फाऊंडेशनने” पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर तैनात पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण पोलीस बांधवांनाही नियमित चहा आणि नाष्ट्याची सोय करून त्यांनाही दिलासा देत मदतीचा हात दिला आहे.
वसुधैव कुटुंबकम ही संस्कृती आणि सर्व मानवजात एकाच माता पित्याची लेकरे आहेत अर्थात सर्व मानवजात एकमेकांची भावंडे आहेत, न कोणी उच्च ना कोणी नीच, तर सर्वश्रेष्ठ मनुष्य तोच आहे जो या कुटुंबाशी, आपल्या भावंडांशी सद्व्यवहार करतो, भुकेल्याला जेवू घालतो ही प्रेषितांची शिकवण समोर ठेऊन “जकात फाऊंडेशनने” सामाजिक बांधिलकी जपत गरजवंतांना धान्य, मुंबई पुण्याहून पायपीट करत येणाऱ्यांना पाणी, जेवण, फळे तर पोलीस बांधवांसाठी नियमित चहा आणि नाष्ट्याची सोय अशा तिन्ही आघाड्यांवर करीत असलेल्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


