shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माणगांव तालुक्यात वसंत ऋतूतच मेघगर्जनेसह पावसाचे आगमन, सर्वत्र मृदगंधाची दरवळ.



      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) 
       चैत्र महिना सुरू असल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यातील वातावरणात सर्वत्र कमालीची उष्णता निर्माण झाली असून नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवत आहे. दुसरीकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लाॅकडाऊन सुरू आहे. कोरोना व्हायरसची संक्रमण साखळी रोखून त्यावर मात करण्यासाठी सरकारी सूचनांचे पालन करून सर्व नागरिक संपूर्ण लाॅकडाऊन काळात घरातच बसून आहेत. दुसरीकडे वातावरणात पसरलेली उष्णतेची लाट यामुळे नागरिकांना दिवसरात्र प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतो आहे.    


      सद्या चैत्र महिना सुरू आहे. वसंत ऋतूच्या प्रभावामुळे सर्वत्र प्रचंड उष्णता आणि उकाडा जाणवत आहे. वातावरणातील बहुतांश वनस्पती पर्णत्याग करून निष्पर्ण झाल्या आहेत. पर्णत्याग केलेल्या वनस्पतींना नुकतेच नवीन पर्णांकूर फुटत आहेत. अशातच शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी दुपारी ३ :०० वाजता माणगांव तालुक्यातील वातावरणात अचानक बदल झाला. तालुक्याच्या चारही बाजू काळ्याभोर होऊ लागल्या, बघता बघता समोरून सोसाट्याचा वादळवारा सुरू झाला आणि थोड्याच वेळात संपूर्ण माणगांव तालुक्यात सर्वत्र मेघगर्जनेसह हलक्या टपटप पावसाच्या सरी पडू लागल्याने लहान मुलांनी यथेच्छ उड्या मारत एकच कल्लोळ सुरू केला. पाऊस आला... पाऊस आला.... प्रत्येक घरातील मोठी मंडळी देखील क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ दरवाज्यातून, खिडकीतून बाहेर कुतुहलाने पाहू लागली. खरोखरच बाहेर पाऊस पडत आहे हे पाहिल्यावर घरात  एखादे मोठे संकट आल्याप्रमाणे सर्वांची घराबाहेर पडून पळापळ आणि धावाधाव सुरू झाली. 

      कारण प्रत्येक घरातील माणसांनी घराबाहेरील अंगणात तर कुणी घराच्या छपरावर तर कुणी गुरांची वैरण म्हणून साठवण केलेल्या पेंढ्यांच्या माचावर मिळेल त्या ठिकाणी उन्हात वाळत ठेवलेली कडधान्ये, आगोटीसाठी म्हणजे पावसाळी हंगामासाठी तिखट मसाला तयार करून ठेवण्यासाठी वाळत ठेवलेल्या मिरच्या, पापड, भाकरी साठी स्वच्छ धुवून वाळत ठेवलेले तांदूळ, कण्या, आंबोशी,उसरी, धुवून वाळत ठेवलेले कपडे, बी बियाणे पावसात भीजू नये म्हणून  सर्वांची युद्धपातळीवरील ही धावपळ सुरू होती. 

     कडक रखरखीत उन्हाळ्यात तप्त मातीवर अचानक पडलेल्या पावसाच्या सरीं मुळे निसर्गातील मातीचा मनमोहक असा मृदगंध आणि कमालीचा गारवा वातावरणात सर्वत्र वार्यासारखा पसरला. जगातील कोणत्याही बाजारपेठेत कुठेही कितीही रूपये खर्चून न मिळणार्या या नैसर्गिक मृदगंधाने सर्वांना संमोहित केले. वातावरणातील प्रचंड उकाड्याने ल्हाई ल्हाई झालेल्या तसेच लाॅकडाऊन मुळे वैतागलेल्या आणि कोरोना व्हायरसच्या भीतीने भयभीत झालेल्या माणसांच्या मनातील भयगंड आणि क्षीण काही क्षणासाठी नाहीसा झाला.
close