बेळगांव: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव राज्यात वाढतच चालला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीच वातावरण आहे. त्यातच सोशल मीडियावर फिरणाऱ्या फेक मेसेजचमुळेही लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक व्यक्ती नाका-तोडांला नोटा चुरगाळत होता. याच संशयाने बेळगांव परिसरात लोकांनीही नोटा जाळल्याचा प्रकार घडला आहे.
कोरोनाची धसका लोकांनी इतका घेतला की, लोकं आता रस्त्यावर पडलेल्या नोटा देखील उचलायला घाबरत आहेत. बेळगांव परिसरात अशीच एक घटना समोर आली आहे. रस्त्यावर नोटा पडल्या होत्या. मात्र, कोणी उचलण्याची हिंमत देखील केली नाही. नाझर कँप वडगांव येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
कोरोनाच्या धास्तीने रस्त्याच्या कडेला बेवारस नोटा जाळल्याचे निदर्शनास आलेय. मिळालेल्या माहितीनुसार या नोटांमध्ये 10, 50, 100 रूपयांचा समावेश आहे. ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वीची आहे. चलनी नोटा रस्त्याच्या बाजूला दिसल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोणताही धोका नको म्हणून या नोटा परिसरातील लोकांनी जाळल्या.
एरव्ही रस्त्यावर 10 रुपयाची नोट जरी कोणाला दिसली तरी ती लोकं उचलत असत. पण आज देशात अशी परिस्थिती ओढवली आहे की, कोरोनाच्या भीतीमुळे लोकं कोणत्याही वस्तूला हात लावताना हजारदा विचार करतात.
बेळगांव जिल्ह्यामध्ये 36 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. गुरुवारी फक्त एकाच दिवशी 17 कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे बेळगांवमध्ये चिंतेचे आणि भीतीचं वातावरण आहे.


