✍🏻मी पत्रकार बोलतोय .. या माध्यमातून लिखाण करण्याचा माझा प्रयत्न सफल होताना दिसतो आहे .
आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त मला पत्रकार म्हणून त्यांची ओळख करावी या कल्पनेने हा माझा बालिशपणा असेल कदाचित. पण तो करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
डॉ .बाबासाहेब आंबेडकारांची ओळख घटनाकार, घटनातज्ञ, कायदेपंडित, अर्थतज्ञ अशा अनेक अंगांनी जगाला परिचित आहे., पण एक पत्रकार डॉ. आंबेडकर म्हणून अद्यापही वृत्तपत्रसृष्टीने सुध्दा बाबासाहेबांची म्हणावी तेवढी दखल घेतल्याचे दिसून येत नाही. वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही काही पोटभरू किंवा प्रचारकी पत्रकारिता कधीच केली नाही. तर त्या पत्रकारितेला समाजोद्धाराचे पर्यायाने राष्ट्रोद्धाराचे मूलभूत अधिष्ठान लाभलेले होते. या बाबीकडे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकतर जाणीवपूर्वक कानाडोळा केला किंवा पारंपरिक मानसिकतेमुळे या पत्रकारितेची दखल घ्यावी असे त्यांना वाटले नसावे.
डॉ. बाबासाहेबांनी मूकनायक (1920), बहिष्कृत भारत (1927), जनता (1930) आणि प्रबुद्ध भारत (1956) या नावांनी पाक्षिके चालविली. यापैकी जनता आणि प्रबुद्ध भारत ही त्यांच्या चळवळीची मुखपत्रे असली तरी त्यांचे संपादन बाबासाहेबांनी स्वत: न करता सहकार्यांकडून करून घेतले. मात्र 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत' या दोन्ही वृत्तपत्रांचे संपादन मात्र त्यांना स्वत:लाच करावे लागले. बहिष्कृत भारताच्या संपादनात बाबासाहेब हे स्वत: ओळ न ओळीकडे लक्ष देत असत. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, '' बहिष्कृत भारताच्या संपादकास मदत करणारा दुय्यम संपादक ठेवण्याइतकी वृत्तपत्राची सांपत्तिक स्थिती नव्हती तसेच बिनामोबदला संपादकीय काम करण्यास स्वार्थ्यत्यागी असा दलितातील माणूसही लाभला नाही. बहिष्कृत भारताच्या संपादकाच्या प्रौढ लिखाणास दबून गेल्याने म्हणा किंवा सार्वजनिक कार्याविषयी कळकळ वाटली नसल्यामुळे बाहेरच्या लोकांचा त्यास मिळावा तितका पाठिंबा मिळाला नाही. अशा बिकट परिस्थितीत बहिष्कृत भारताचे 24-24 रकाने लिहून काढण्याची सारी जबाबदारी एकट्या संपादकास घ्यावी लागली.
थोडक्यात, बाबासाहेबांची पत्रकारिता सखोल जाणून घेण्यासाठी 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत' ही वृत्तपत्रे त्यासाठी आधारभूत आहेत. या वृत्तपत्रांमधून डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे समग्र दर्शन घडते.
काय करूं आतां धरूनिया भीड। नि:शंक हें तोंड वाजविले। ।
नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण। सार्थक लाजून नव्हे हित। ।
' मूकनायक' च्या सुरवातीलाच बाबासाहेबांनी लिहिलेल्या या ओळीतून त्यांची भूमिका स्पष्ट होते. मूकनायकाने त्याकाळी सर्वार्थाने मुक्या असलेल्या समाजाला खर्या अर्थाने आवाज दिला. त्याकाळच्या वृत्तपत्रांचे दोन मुख्य उद्देश दिसून येतात. पहिला म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाला गती देणे आणि दुसरा म्हणजे समाज सुधारणा करणे. बाबासाहेबांची पत्रकारिता मात्र यापेक्षा वेगळी म्हणजेच संपूर्ण मानवमुक्तीचा धगधगता अंगार होती. वरपांगी समाज सुधारणा बाबासाहेबांना मान्य नव्हती. एका बाजूला राजकीय स्वातंत्र्यासाठी आकाशपाताळ एक करणारे नेते याच देशात माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी., यासाठी तोंडातून शब्दसुद्धा काढायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत दुसर्या बाजूला माणसाला माणूसकीचे निसर्गदत्त हक्क मिळवून देण्याचा , त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाबासाहेबांच्या वृत्तपत्रातून केला जात होता. व्यवस्थेने हजारो वर्षांपासून आवाज दाबून टाकलेल्या समाजाला मूकनायकच्या रूपाने नवा आवाज मिळाला.
त्यातून बाबासाहेबांच्या लेखणीचे अनेक पैलूही स्पष्ट होतात. बाबासाहेबांची पत्रकारिता जशी आक्रमक, तितकीच संयमी होती. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक लेखातून त्यांच्या प्रचंड विद्धत्तेचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. मूकनायकमधील बाबासाहेबांचे लेख प्रचंड कोटीचे तत्वज्ञान होते. उदाहरण म्हणून काही वाक्ये निश्चितपणे पाहावीत.
समाज ही एक नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणार्या उतारूने जाणून बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गंमत पाहण्यासाठी म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा , जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले , तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी नाही तर मागाहून का होईना जलमाधी घ्यावी लागणार आहे.
( मूकनायक अंक पहिला 31 जानेवारी 1920)
राजकारणाचे सर्वसाधारण असे दोन हेतू आहेत. एक शासन व दुसरा संस्कृती. (मूकनायक अंक दुसरा 14 फेब्रुवारी 1920)
अन्याय सहन न होणे हेच मनुष्याच्या मनाचे उन्नत स्वरूप होय. (मूकनायक - अंक 14 वा 14 ऑगस्ट 1920)
मी पत्रकार बोलतोय
समुपदेशक :-अरूण ठोंबरे
संपादक श्री साम्राज्य
9322107521/9527154112


