- शासनाकडून कोणताही फॉर्म भरुन घेतला जाणार नाही.
लातूर | प्रतिनिधी :
कोरोना -19 विषाणुचा प्रार्दुभावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. सदर लॉकडाऊन कालावधीत इमारत व बांधकामांची कामे बंद झालेली आहेत. राज्यातील इमारत व इतर बांधकामावर काम करणाऱ्या नोंदणीकृत सक्रिय (जिवित ) बांधकाम कामगारांना सध्या कोणतेही कामकाज करता येत नाही.
त्यामुळे या सर्व बांधकाम कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी अथवा घरी थांबावे लागत आहे. त्यांना दररोजची रोजंदारी मिळत नाही. यामुळे त्यांना दैनंदिन गरजांची तजवीज करतांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्याची लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता मंडळाकडील नोंदणीकृत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांना प्रत्येकी रु. २०००/- इतके अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (DBT) व्दारे जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
जिल्हा स्तरावर बांधकाम कामगारांची गर्दी जमा होऊन कोरोना-19 या विषाणूचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी जिल्हा कार्यालयाऐवजी नोंदित सक्रिय (जिवित ) बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून कोणताही फॉर्म भरुन घेतला जाणार नाही.
लातूर जिल्हयातील नोंदित सक्रिय (जिवित ) बांधकाम कामगारांनी कोणत्याही एजंट/दलालांच्या भुलथापांना बळी पडू नये. तसेच कोणतेही एजंट/दलालाशी संपर्क करु नये व कोणतीही माहिती त्यांना सर्पुद करु नये तसेच यासाठी कार्यालयात गर्दी करु नये असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, लातूर यांचे मार्फत करण्यात आले आहे.


