इंदापूर | प्रतिनिधी |
जगाला विळखा घातलेल्या कोरोना ह्या विषाणुच्या वाढत्या उद्रेकामुळे ग्रामीण भागातील नागरिक योग्य ती सुरक्षितता व सोशल डिस्टंन्स पाळत आहेत. इंदापूर मध्ये देखील या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे निरव शांतता व योग्य प्रकारचे नियोजन दिसून येत आहे. इंदापूर मध्ये तब्बल ३५ जणांना होम क्वारंटाइनमध्ये ठेवलेले आहे असे इंदापूरच्या तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. तसेच सदर व्यक्तींवर प्रशासनाचे व आरोग्य कर्मचारी यांचेही लक्ष आहे.
इंदापूरकरांना आरोग्याविषयक व सोशल डिस्टनिंग विषयी योग्य सुचना दिल्या जात आहेत व त्या नागरिकांकडून योग्य पाळल्या जात आहेत असेही यावेळी त्या म्हणाल्या. इंदापूर मध्ये मंडई ही बसस्थानक व इंगोले मैदान, टेंभुर्णी नाका या दोन ठिकाणी रोज सकाळी ७ ते ९ या वेळेत भरते त्यामुळे नागरिकांची गर्दी होत नाही. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे. इंदापूरचे नागरिक पोलिस प्रशासनाला व आरोग्य विभागाला सहकार्य करतानाचे चित्र या लाॅकडाऊनमध्ये दिसत आहे.



