बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर सर्व प्रकारच्या उपाययोजना राबवत आहे. कोरोना मुक्तीच्या या लढाईत संपूर्ण देशातील शासकीय प्रशासकीय सर्व प्रकारच्या यंत्रणा अहोरात्र कंबर कसून कामाला लागल्या आहेत. शासन दररोज प्रसार माध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना सांगत आहे. तरी सुद्धा काही नागरीक लाॅकडाऊन सारख्या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य न ठेवता अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडून शहरातील बाजारपेठेत विनाकारण नाहक गर्दी करत आहेत.
नागरिकांच्या सदर बेजबाबदार वर्तनामुळे पोलीस यंत्रणेवर आणि एकूणच सर्व प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो आहे. नागरिकांनी अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी, शहरात किंवा बाजारपेठेत विनाकारण गर्दी केल्याने कोरोना विषाणूच्या संक्रमण साखळीस पोषक वातावरण निर्माण होईल व त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव प्रचंड प्रमाणात वाढून नागरिकांना मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. आणि चीन, फ्रांस, जर्मनी, स्पेन, लंडन, इटली आणि अमेरिका या देशांप्रमाणे आपल्याही देशातील परिस्थिती आपल्या हाताबाहेर जावू शकते.
अशी परिस्थिती आपल्या शहरात निर्माण होवू नये म्हणून रायगड जिल्ह्यातील माणगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माननीय सौ. योगिता चव्हाण मॅडम, उपनगराध्यक्ष माननीय श्री. दिलीप जाधव साहेब व माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माननीय श्री. राहुल इंगळे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि सर्व माननीय नगरसेवक, नगरसेविका तसेच कर्मचारी यांच्या सहकार्याने माणगांव नगरपंचायतीच्या हद्दीतून माणगांव शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगांव शहरात ठिकठिकाणी कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर सुवाच्य ठळक अक्षरातील कोरोना प्रतिबंधात्मक संदेश नागरिकांचे, वाहन चालकांचे लक्ष वेधून त्यांना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाला सहकार्य करा, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सचे आणि एकूणच कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक संदेश देत आहेत.


