महाड । प्रतिनिधी ।
स्वराज्याच्या राजधानीस आवश्यक असलेले गुण किल्ले रायगडमध्ये छत्रपति शिवरायांना आढळले.🚩 त्यामुळेच त्यांनी या गडाची राजधानी म्हणून निवड केली. प्रचंड उंची, वर जाण्याचा एकच मार्ग, 'अतिशय विस्तृत पठार ' या सर्व गोष्टीबरोबरच रायगडाची समुद्राशी असलेली जवळीक, आणखी काय हवे होते. दुरदृष्टीपणा हा महाराजांचा महत्वपूर्ण गुण. त्याचीच साक्ष या किल्ल्याची निवड सहजतेने देते.
हिरोजी इंदुलकर यांना रायगडावर राजधानी करण्यासाठी बांधकाम करण्यास महाराजांकडून आदेश प्राप्त झाला आणि आपले संपूर्ण कसब पणाला लावून त्यांनी या किल्ल्यावर राजसभा, राजनिवास, न्यायसभा, कल्याणसभा, विवेक सभा, दारु कोठारे, अंबरखाने, मंत्र्यांची निवासस्थाने, कचेऱ्या, नगरपेठ, किर्तीस्तंभ, तलाव, मंदिरे, खलबतखाना, हत्तीशाळा, अश्वशाळा, वस्त्रागार, रत्नागार, जगदीश्वर प्रासाद, करमणुकीची स्थाने याबरोबरच गडाच्या संरक्षण व्यवस्थेतील कडे तासणे, तटबंदी बांधणे, महाद्वार आणि बुरुज, चोरवाटा उभारल्या.
छत्रपति शिवाजी महाराजांची किर्ती ऐकून उत्तरेकडून रायगडावर आलेल्या कवी भुषण रायगडचे काव्यमय वर्णन केले आहे तो लिहतो,
“छत्रपति शिवरायांनी सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वस्ती स्थान केले या किल्ल्यावरील शिव दरबार व तेथील ऐश्वर्य पाहून कुबेरही लाजू लागला हा किल्ला_ एवढा प्रचंड विशाल आहे कि त्यात तीनीही लोकीचे वैभव साठविलेले आहे किल्ल्या खाली भूभाग जलमय पाताळाप्रमाणे माची म्हणजे पायथ्याच्या उंचवट्याचा भाग पृर्थ्वीप्रमाणे व वरील प्रदेश इंद्रपुरी प्रमाणे शोभतो."



