श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला रोजगार राहिला नाही. यातच खाजगी फायनान्स वाल्यांकडून कर्ज हप्त्यांची सुलतानी वसुली सुरू आहे. ती त्वरित थांबविण्यात यावी. अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिला आहे.
प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, करोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व देश लॉक डाउन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने ज्याप्रकारे शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या बँक, फायनान्स कंपन्या, पतसंस्था आदींकडून अनेकांनी कर्ज घेतलेले आहे. हे कर्ज माफ करावे, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
अनेकांची खायची पंचायत झाली असून, हे कर्ज कसे फेडणार कसे? त्यातच खाजगी फायनान्स, पतसंस्था यांचे वसुली अधिकारी कर्जाचे हप्ते घेण्यासाठी अनेकांना हीन वागणूक देत आहेत. या सर्वांचे कर्ज माफ करावे अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. अन्यथा या वसुली अधिकाऱ्यांना तसेच खाजगी फायनान्सवाल्यांना मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा शिंदे यांनी निवेदनात दिला आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव डॉ. संजय नवथर, सुरेश जगताप, सुभाष सोनवणे, निलेश सोनवणे, गणेश दिवसे, सचिन पाळंदे, विशाल शिरसाठ आदींच्या सह्या आहेत.

