बांधकाम कामगार हवालदिल....
लातूर:लाॅकडाऊनच्या काळात बांधकाम मजुरांना दोन हजार रूपये मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. ही मदत तुटपुंजी असून सद्यस्थिती लक्षात घेता शासनाने सरसकट १० हजार रूपये मदत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हाध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवले आहे.
लाॅकडाऊनचा कालावधी तिस-यांदा वाढवण्यात आल्यामुळे नवीन बांधकामे ठप्प आहेत. त्यामुळे हजारो कामगार हवालदिल झाले आहेत. राज्यशासनाने राज्यातील नोंदणीकृत १२लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी २हजार रूपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. परंतु ही मदत मिळण्यात कामगरांना जाचक अटींचा सामना लागण्याची शक्यता आहे. शिवाय रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने कुटुंबाचा गाडा कसा चालवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे सामाजिक कार्यकर्ते प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी लक्ष वेधले आहे.
शासन दरबारी नोंद असलेल्या कामगारानाच मदतीचा फायदा होणार असेल तर, अर्ध्यापेक्षा जास्त गरीब कामगार वंचित राहतील. लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. यातील बहुतांश बांधकाम कामगारांचे नोंदणी कार्ड जून २०१८ पासून नूतनीकरण करण्यात आलेले नाही. शासनाने ही जाचक अट ग्राह्य धरली तर गरीब कामगारांवर उपासमारीची वेळ येईल, असे प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी निवेदनात म्हटले आहे. मंडळाकडे आठ हजार पाचशे कोटी रूपये जमा असल्याचे सांगितले जाते. या निधीतून कामगारांसाठी योजना राबविल्या जातात. परंतु निधी तसाच पडून आहे. शासन केवळ दोन हजार रूपये अनुदान देत असेल तर, केवळ २४ कोटी रक्कम वाटप होईल. हा गोरगरीब कामगारांवर अन्याय आहे, असे श्रीकांत मुद्दे यांनी निवेदनात नमूद केले. कोरोनामुळे हजारो कामगार रोजगारापासून वंचित असून पुढील चार महिने पावसाळा असल्याने त्यांच्यासमोर चरितार्थाचा प्रश्न उभा आहे. हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे सरसकट दहा हजार रूपये मदत करावी, अशी मागणी भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हाध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रमुख मागण्या :
१. राज्य शासनाने नुतनीकरणाची जाचक अट रद्द करून सरसकट कामगारांना प्रत्येकी दहा हजार रूपये अनुदान द्यावे.
२. नूतनीकरणाच्या नावाखाली होणारी लुबाडणूक थांबवावी.
प्रा.श्रीकांत मुद्दे, लातूर
मो.9823360226


