पिंपरी-चिंचवड:
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी दिवसभरात एकही कोरोनाचा ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण आढळला नव्हता. मात्र काल रात्री उशिरा आलेल्या अहवालात पिंपळे गुरव आणि जुनी सांगवी परिसरातील २ जण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंत कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रूग्णांची संख्या ११५ वर पोहचली असून ५२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहराबाहेरील दोन रूग्णांसह ५ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जुनी सांगवी, पिंपळे गुरवचा काही परिसर आज (दि.०२) रात्रीपासून सील करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पिंपळे गुरव आणि जुनी सांगवी येथील परिसरातील दोघांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आलेत. त्यामुळे आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ११५ वर पोहचली आहे. तर आज ७ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. भोसरी आणि चऱ्होली येथील हे रहिवासी असून ‘कोरोनामुक्त’ झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जुनी सांगवी आणि पिंपळेगुरवचा काही भाग आज (दि.०२) मध्यरात्री ११ वाजल्यापासून सील करण्यात येणार आहे.
मधुबन सोसायटी, जुनी सांगवी
(कामटे फुड सर्व्हिसेस–श्री पॉलिक्लिनिक–महा ई सेवा केंद्र–महाराजा वाईन्स–स्पायसर कॉलेज रोड–स्पायसर पुल–मुळा नदी–सी.क्यू.ऐ.ई.बॉर्डर-कामटे फुड सर्व्हिसेस) व गांगुर्डे नगर, शिरोडे रोड.
पिंपळे गुरव
(विमल इलेक्ट्रिकल–शिरोडे रोड–पाण्याची टाकी– मराठी शाळा–कृतीका ऍक्वा–ऍक्सीस बँक ए.टी.एम.–युनायटेड डायग्नोस्टिक सेंटर–चंदन टी हाऊस-विमल इलेक्ट्रिकल)
येथील परिसर आज मध्यरात्री ११ वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.


