shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पपनीस … कोकणचं आश्चर्य..

लहानपणी मी माझ्या आजोळी म्हणजे देवळे या गावी जायचो. रत्नागिरी कोल्हापुर रस्त्यावर रत्नागिरी पासुन सुमारे २३ मैलावर देवळे मार्ग निवारा लागतो. तीथुन उत्तरेला साधारण दोन मैलावर देवळे गाव आहे. तसं बघीतलं तर वर्षातुन एक दोन खेपा नक्कीच होत होत्या. उन्हाळी सुट्टीत तर हमखास चार पाच दिवस मुक्काम. लहानपणी तीथे सगळीच भावंड जमायची. इतर सगळ्या गमती बरोबर एक आठवण अजुनही लक्षात आहे ती म्हणजे पपनस. बोली भाषेत पपनस पण खर नाव पपनीस. गावठी मोसुंबच. आंबट गोड असं पण संत्र मोसुंब या पेक्षा मोठ्ठं फळ. दुपारी कोणीतरी भावंडातलं झाडावर चढुन एखाद पपनस काढायचा. एक दोन जशी असतील तशी आणि सर्वानी वाटुन खायचो. नंतर हळुहळु शिक्षण व्यवसाय यामुळं जाणं कमी झालं पण अजुनही इतकी वर्ष झाली त्या पपनसाची आठवण कायम आहे.




परवाच बोलता बोलता माझ्या ओळखीच्या एका माणसाच्या तोंडातुन त्यांच्या आगरातील पपनस तोडुन टाकल्याचा उल्लेख ऐकला आणि मला माझ्या आजोळच्या पपनसाची आठवण झाली. भरपुर वर्षात खायलाच मिळालेलं नाही. आणि योगायोग इतका चांगला की रत्नागिरीत लॉक डाउनच्या आधी एक मित्र भेटला आणि त्याचा पिशवीत पपनस बघितलं. पपनसा बरोबर सगळ्याच आठवणी आल्या. त्या सणकीतच घरी आलो आणी दोन तीन मित्राना फोन करुन पपनस कुठे मिळु शकेल या संबंधी माहिती घेवुन त्याकरीता फोन करुन दोन दिवसानी जीथे उपलब्ध होतं तीथे उन्हातुन जावुन खावुनही आलो.

पपनस मिळालं खर पण एक दु:ख वाटलं की साध्या पपनसाकरीता एवढा खटाटोप ? आणि मग हळु हळु माहिती घेतली. कोकणातलं एक सुंदर असं फळ पण त्याची व्यावसायिकता लक्षात न घेता होती ती झाडं तोडुन टाकली गेली. विचार केला की यात वेगळं असं काय आहे ? घरात बसलेलो असल्याने वेळ मिळाला आणि मग हळु हळु माहिती मिळवली. डोकं चक्रावलं. इतकं चांगलं फळ. लोकाना काहीच माहीती नाही. ही माहिती सगळ्यांपर्यंत गेलीच नाही त्याचे हे परिणाम होते.

मित्रानो कोकणात पिकणारं असं हे उत्कृष्ट फळ. पण सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या कोकणात काही शेकड्यातच झाडं आहेत असा उल्लेखही मिळाला. तेव्हा आपल्या परसात जर झाड असेल तर ते तोडु नका. उलट त्याची रोपं तयार करा. एका चांगल्या फळाला आपण न्याय देवु शकत नसाल तर काय उपयोग ?
यापुढे पपनशीचं झाड तोडु नका. त्यातुन निदान पाच झाडं लावा हीच विनंती.

हे सगळं कशाला ? पपनस बचाव मोहीम चालु करुयात. खाली सगळी माहिती देतोय. वाचा. त्याचं महत्व लक्षात घ्या.

" पपनस वाचवा "

अधिक माहिती व उपयुक्तता

पपनस ही एक लिंबू वर्गीय वनस्पती आहे. रूटेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सिट्रस मॅक्झिमा असे आहे. याला इंग्रजीमध्ये पोमेलो असे म्हणतात.

पपनसाचे फळ
पपनसाचे झाड ३० ते ३५ फुट उंच वाढते. पानांचा रंग गडद हिरवा असतो. पपनसाची फुले पांढऱ्या रंगाची असतात. झाडाला फुलांचे गुच्छ लागतात. फळे मोठ्या चेंडूच्या आकाराची,हिरव्या सालीची, १० ते ३० सेंमी व्यासाची असतात. वजन सुमारे १-२ किलोग्रॅम भरते. फळे पिकू लागली की साल पिवळ्या रंगाची होते. फळ सोलले की आत पांढऱ्या रंगाचे बरेच जाड भुसभुशीत आवरण असते. ते सोलल्यावर आत मोसंब्याप्रमाणे फोडींची रचना असते. पांढरा गर किंवा वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी रंगाचा गर असलेल्या पपनसाच्या दोन जाती आहेत. फळ कच्चे असेल तर गर बराच कडवट लागतो. फळ पिकल्यावर हा कडवटपणा कमी होतो. बियांपासून रोपे तयार करता येतात.

आढळ
महाराष्ट्रातील कोकणात विशेषत: ही झाडे जास्त प्रमाणात आहेत.

स्थानिक नाव
पपनसाला 'चकुत्र' 'बंपर' आणि 'चकोत्रा' अशा स्थानिक नावानी ओळखले जाते. पपनीस / पपनस

वापर
पपनस ही एक औषधी वनस्पती आहे. पपनसाचा गर पौष्टीक तसाच ज्वरनाशी आहे. पपनसाचा गर साखर घालून खातात. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि 'क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते. त्यापासून मुरंबे, मार्मालेड असे पदार्थ बनवतात. फुलांपासून अत्तर तयार करतात. लाकूड थोडेसे कठीण असते.त्यापासून अवजारांच्या मुठी तयार करतात.

मुख्य म्हणजे पपनसाच्या सालीपासुन ती उन्हात सुकवुन पावडर करुन मधातुन खाल्ल्यास ज्वर नाष होतो. ओली साल चावुन त्याचा रस पियाल्यास रक्तदाब नियंत्रणात येतो. पपनसाच्या सालीची चटणी पौष्टीक व पोट विकार घालवणारी असते. मोसुंब व संत्र या प्रमाणे त्याचे ज्युस पिण्यास उत्तम. साखर व मीठ चवीप्रमाणे घालुन घेतल्यास उन्हाचा त्रास कमी हितो. उन्हाळ्यात निसर्गाने दिलेलं हे वरदान आहे. डोळ्यात आंजुर्ली झाल्यास साल चिमटीत धरुन दाबुन रस डोळ्यात उडवल्यास आंजर्ली बरी होते. याचा रस काढुन ठेवता येतो. सरबत अतिशय छान होते. आंबा काजु रातांबा या प्रमाणे हे ही एक उत्कृष्ट फळ आहे.

पपनसाची रोपे वाढवा व इतरत्र लागवड करा.

श्रीकृष्ण पंडित
रत्नागिरी.
9420054040
close