हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.21 मे हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील सापटगांव अंतर्गत येत असलेल्या खंडोबा महाराज माळटेकडीवर असलेल्या जय भिम नगर वस्ती गेल्या पाच महिन्यापासुन अंधारात आहे व त्यातच लाॅकडाऊन असल्यामुळे येथील रहिवाशांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
जय भिमनगर मधील विजपुरवठा महावितरण कंपनीने गेल्या पाच महिन्यापासुन बंद केल्याने येथील जवळपास 20 कुटुंबियांना अंधारात राहावे लागत असल्याचा आरोप येथील रहीवाश्यानी केला आहे.सध्या कोरोनाच्या पाश्वभुमीवर सर्वत्र लाॅकडाऊन केले असुन येथील रहिवाशांना हाताला काम नाही.शासनाकडुन प्रत्येक व्यक्तीला 5 किलो तांदूळ मोफत भेटले असुन राशनचे थोडेफार गव्हु मिळाले परंतु ते ही धान्य संपल्याने व हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.त्यातच या वस्तीला गेल्या पाच महिन्यापासुन विजपुरवठा नसल्यामुळे संध्याकाळी दहशतीचे वातावरण निर्माण होत असुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असुन रहीवाशांना शेतातुन दोन कि.मी.पायपीट करून पाणी आणावे लागत आहे.विजप्रश्नी वारंवार सेनगांव महावितरण कंपनीला हेलपाटे मारून देखील विजपुरवठा सुरळीत करण्यात येत नाही.केंद्रातील व राज्यातील सरकार कोरोना परीस्थितीत एक ही गोरगरीब उपाशी राहु नये म्हणून प्रयत्न करीत असतांना जय भिमनगर मधील रहिवाशी मात्र दुर्लक्षित राहील्याचे चित्र दिसुन येत आहे.जय भिमनगर मधील रहीवाशी बोलतांना म्हणाले की,मायबाप सरकारने आमच्या वस्तीमध्ये त्वरीत विजपुरवठा चालु करून आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा व अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे.

