सावळीविहीर। राजकुमार गडकरी:
देशात कोरोना विषाणुमुळे होत असलेल्या कोविड १९ या अनपेक्षित आणि अभूतपूर्व अशा जागतिक महामारीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण आपापल्यापरीने सामाजिक जाणीव व्यक्त करतांना दिसून येत आहे. तसेच या संकटकाळात विविध प्रकारे आपापल्या परीने मदत करीत आहे ,देशात 24 मार्च पासून लॉकडाऊन सुरु करण्यात आला असला तरी साईबाबांच्या शिर्डी १७ मार्च दु. ३ वा.पासून साईंबाबाचं मंदिर बंद करण्यात आले आहे. त्यास आता दोन महिने होऊन गेले आहेत, शिर्डीत सर्व बंद असल्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत, साई मंदिर बंद असल्यामुळे साईभक्त येणेही बंद आहे, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात थोडी ढिलाई देण्यात आली आहे, शिर्डीत सोमवार मंगळवार, बुधवार, शुक्रवार शनिवार या दिवशी सकाळी नऊ ते दोन या वेळेत काही दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र लॉज रेस्टॉरंट हॉटेल फार प्रसादाची दुकाने यांना मात्र बंदी आहे. येथे कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून मोठे प्रयत्न केले जात आहे. रविवार व गुरुवार जनता कर्फ्यू शिर्डीत असणार आहे.येथील नागरिकही मोठे सहकार्य करीत आहे. दरम्यान येथिल विविध संघटनाही आता पुढे येवून पोलीसांना मदत करतांना दिसून येत असून अशा परिस्थितीत शिर्डीत कोरोना वॉरियर्स हे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.
या पथकात छत्रपती शासनचे ८ स्वयंसेवक,राजे प्रतिष्ठाण ६,मित्रप्रेम संघटना ६,स्वराज्य सेना ६..शिर्डी युवा ग्रामस्थ ६ अशा कोरोना वॉरियर्सना विभागीय पोलीस आधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या सिमेवरील चेक पोस्ट ची जबाबदारी देण्यात आली आहे.शिर्डीत प्रवेश करण्याचे मार्ग लुटे वस्ती, पिंपळवाडी रोड, आरबीएल बॅंक चौक, मेनरोड, श्रीराम सर्कल, विमानतळ रोड, नांदुर्खी, शासकिय विश्रामगृह, अशा मुख्य ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे.याठिकाणी शिर्डी पोलीसस्टेशनचा एक कर्मचारी,वाहतूक शाखेचा एक साईसंस्थानचे दोन सुरक्षा रक्षक आणि स्वयंमसेवक कोरोना वॉरियर्स दोन असे तैनात करण्यात आले आहे. यामुळे शिर्डीत इतर ठिकाणाहून येणाऱ्यांची चौकशी होणार आहे. शिर्डी शहर अजून कोरोणा मुक्त आहे व भविष्यात शिर्डी कोरोना मुक्त रहावी यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत ,नागरिकांनाही कोरोना योध्देना सहकार्य करावे, लॉक डाऊन चे नियम पाळावेत असे आवाहनही करण्यात येत आहे.


