पिंपरी-चिंचवड:
पिंपरी चिंचवडमध्ये आज दिवसभरात दहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे रुग्ण मोशी, पिंपळेगुरव, चिंचवड, मोहननगर या भागातील आहेत. त्यामुळे आजपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १४५ झाली आहे. त्यातील ६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी येथील रुग्णालयात एकूण कोरोना झालेले ७३ रुग्ण दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकानुसार कोरोनाची लागण झालेले शहरात आतापर्यंत १४५ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ६० रुग्ण योग्य उपचारानंतर कोरोनावर मात करत आपापल्या घरी परतले आहेत. आतापर्यंत ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील चार रुग्ण हे पिंपरी-चिंचवड शहराचे रहिवासी नाहीत. सध्या शहरात एकूण ७३ कोरोना रुग्ण आहेत. आज बुधवारी शहरातील एकूण दहा नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व रुग्ण मोशी, पिंपळेगुरव, चिंचवड मोहननगर या भागातील आहेत.
कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे मोशी येथील वुड्सविले सोसायटी बॉर्डर, वुड्सविले रोड, वुड्सविले ऑफिस, साई फॅब्रोटेक, हॉटेल शेअरिंग स्पून, आर्या हॉस्पिटल, डीपी रोड तसेच चिंचवड, मोहननगर येथील श्रीराम सुपर मार्केट, श्रीराम मेडिकल शॉप, श्रीराम चौक, टाटा मोटर्स सर्व्हिसिंग सेंटर, वसंत इंडस्ट्रिज, चिखली बीआरटी टेल्को रोड, जम्बो किंग हॉटेल, एचडीएफसी बँक एटीएम, राष्ट्रमाता जिजाऊ मंगल कार्यालय त्याचप्रमाणे काळेवाडी फाटा येथील भारत गॅस, सेंट अल्फोन्सा स्कूल, फेडरल बँक, मदर तेरेसा फ्लायओव्हर, पवना नदी-काळेवाडी पिंपरी पूल, सेवा विकास को ऑप बँक, पोलिस चौकी हा परिसर आज बुधवार रात्री अकरा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येणार आहे. या भागात बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश बंदी आणि आतील व्यक्तीला घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडल्यास तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

