पर्यावरण दिनी ज्ञानेश्वर माऊलींच्या महाआदेशाचे पूजन करुन इमामपूर घाटात वृक्षरोपण अभियानाचे आयोजन
अहमदनगर(प्रतिनिधी)- नगरेची रचावी, जलाशये निर्मावी! महावने लावावी, नानाविधे! या संत ज्ञानेश्वरांच्या ओवीचे आधार घेत पीपल्स हेल्पलाईनने समस्त शेतकरी व वारकरी संप्रदायाला वृक्षरोपण व संवर्धनाचे आवाहन केले आहे. पर्यावरण दिनाच्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींच्या महाआदेशाचे पूजन करुन इमामपूर घाटात पद्मश्री पोपट पवार व माजी कुलगुरु सर्जेराव निमसे यांच्या हस्ते या वृक्षरोपण अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
कोरोना महामारीमुळे या वर्षी पायी दिंडी सोहळा रद्द झाला आहे. तरी वारकरी विठ्ठलाची भक्ती आपल्या घरीच करणार आहे. या भक्तीला वृक्षरोपणाची जोड देत पीपल्स हेल्पलाईनने वारकर्यांना घराभोवती विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत नामदेव यांच्या नावाने 5 झाडे लावण्याचे आवाहन केले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक वारकर्यांनी संघटनेशी संपर्क साधून या अभियानात सहभागी होण्याची सहमती दर्शवली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकातच नागरिकांना पाणी बचत व वृक्षरोपणासह पर्यावरण संवर्धनाचा महाआदेश दिला होता. या आदेशाकडे लोकांनी दुर्लक्ष केल्याने पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले. मनुष्याने लोभासाठी पर्यावरणाचा र्हास केला. पर्यावरणाचे गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन ही काळाची गरज असून, या मोहिमेत वारकरी संप्रदाय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची भावना अॅड.कारभरी गवळी यांनी व्यक्त केली आहे. या अभियानासाठी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन राज्य सरचिटणीस अशोक सिब्बल, कॉ.बाबा आरगडे, भारतीय जनसंसद जिल्हाअध्यक्ष सुधीर भद्रे, डोंगरगण सरपंचकैलास पठारे, अशोक वाकचौरे, शाहीर कान्हू सुंबे, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे आदि प्रयत्नशील आहेत.

