लातूर जिल्हा प्रतिनिधी:
( रवि बिजलवाड)
जुलै ३० / लातूर शहर.
कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे उपचार करणार्या डॉक्टरांवर त्याच्या नातेवाईकाने चाकू हल्ला केला.बुधवारी (दि २९) सकाळी ७ सुमारास येथील अल्फा हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून आरोपीस ताब्यात घेतले आहे. हल्ला झालेल्या डॉक्टरांची प्रकृती सध्या स्थिर असून ते धोक्याच्या बाहेर आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उदगीर शहरातील गांधी नगर भागात वास्तव्यास असलेल्या एका ७५ वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी अल्फा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करतानाच त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे आणि त्यांना डायबेटीज असल्याची कल्पना नातेवाईकांना देण्यात आली होती. त्यानंतर नातेवाईकांच्या आग्रहामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील दोन दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत होत असलेल्या बदलाची कल्पना त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आलेली होती. त्यांच्या शरीरात ऑक्सिजन पुरवठा कमी होत असल्याचेही नातेवाईकांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते,
दरम्यान बुधवारी (दि १९) पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास उपचारा दरम्यान या महिलेचे निधन झाले. रात्रभर रुग्णांवर उपचार करीत रुग्णालयात थांबलेले डॉ. दिनेश वर्मा हे सकाळी ७ वाजता पुन्हा रुग्णालयात आले. रुग्णालयात त्यांच्या राऊंड सुरू असताना हॉस्पिटल च्या तिसऱ्या मजल्यावर ६ ते ७ लोक थांबलेले त्यांना आढळले. त्यातील तिघांच्या तोंडाला मास्क असल्यामुळे डॉ. वर्मा यांनी हटकले. यावर त्यातील एकाने माझ्या आईचे निधन कसे काय झाले, असे म्हणत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यातील काही लोकांना घेऊन ते कोविड सेंटर कडे जात असताना मयत महिलेच्या मुलाने त्यांच्यावर चाकु हल्ला केला.
यात डॉ. वर्मा यांच्या छातीवर, गळ्यावर, मानेवर, हातावर वार झाल्यामुळे ते जखमी झाले. उपस्थित लोकांनी हल्लेखोरस धरून ठेवले. डॉ. वर्मा यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर असून ते धोक्याच्या बाहेर आहेत. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. परंतु आरोपीची आई कोरोना मुळे दगावल्याने आरोपीचा स्वॅब घेण्यात येणार असून त्याच्या अहवाल पाहूनच त्याला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी जी .श्रीकांत यांनी घटनास्थळी भेट दिली या संदर्भात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.

