रायगड-मुरूड जंजिरा:
प्रतिनिधी । विकास मेहेतर
पद्मदुर्ग इतिहास..!!
रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्याजवळ असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दी अतिशय प्रबळ झाले. त्यांच्या आरमारी सामर्थ्याने त्यांनी किनारपट्टीवर दरारा निर्माण केला. सिद्द्यांच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शिवाजीराजांनी मुरूडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा जलदुर्ग बांधला. त्याबद्दल महाराजांनी उद्गार काढले, "पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे. कासा किल्ल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीला चांगलाच पायबंद बसला.".
येथील एक गोष्ट इतिहासात ठळकपणे नोंदली आहे, ती म्हणजे पद्मदुर्गाच्या लाय पाटलांनी धाडसाने जंजिऱ्यावर हल्ला करण्यासाठी मोरोपंतांना साह्य केले होते. पाटलांनी रात्रीच्या वेळी जंजिऱ्याच्या मागील बाजूस पद्मदुर्गावरून येऊन तटबंदीला शिड्या लावण्याचे धाडस केले होते. तटबंदीवर असलेली भक्कम सुरक्षाव्यवस्था भेदणे हे मोठे धाडसाचे काम होते;
पण मोरोपंतांची व पाटलांची वेळ जुळली नाही व प्रयत्न फसला; पण त्यांनी दाखविलेले धाडस पाहून शिवाजी महाराजांनी लाय पाटील याना पालखीचा मान दिला; पण दर्यात फिरणाऱ्या कोळ्यांना पालखीचा काय उपयोग, असे म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली. यावरून महाराजांच्या काय ते लक्षात आले. त्यांनी मोरोपंतांना, एक नवे गलबत बांधून त्याचे नाव ‘पालखी’ असे ठेवून लाय पाटलांच्या ते स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण व दर्याकिनारीची सरपाटीलकी दिली. पद्मदुर्गावर जाण्यासाठी दंडाराजपुरीचे कोळी लोक नावा किंवा यांत्रिक बोटीने समुद्राचे तानमान पाहून घेऊन जातात. किल्ला नौदलाच्या ताब्यात आहे. त्यामुळे तेथे जाण्यासाठी त्यांची परवानगी लागते.

