निसर्ग चक्रीवादळाला नंतर महिना उलटूनही माणगांव तालुक्यातील जनतेला मोफत केरोसीनचा एक थेंब नाही
केरोसीन हवेत उडून गेले की काय ? नागरिकांचा सवाल
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यात ०३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने महावितरणची विद्युत वितरण यंत्रणा पुर्णपणे जमीनदोस्त झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जनतेला अंधाराचा सामना करावा लागत होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना प्रती कुटुंब विना अनुदानित दराचे ०५ लिटर मोफत केरोसीन राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून देण्याची घोषणा अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी केली होती.
माननीय मंत्री महोदयांच्या या मोफत केरोसीनच्या घोषणेला तब्बल एक महिना उलटून गेला तरीही अद्याप जिल्ह्यासह माणगांव तालुक्यातील चक्रीवादळग्रस्तांना मोफत केरोसीन उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे मोफत केरोसीनचे नेमके झाले काय ? आमच्या पर्यंत आलेच नाही अशी माणगांव तालुक्यातील जनतेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांत शासनाच्या ढिसाळ कारभारा विषयी संताप निर्माण झाला आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने विद्युत पुरवठ्या अभावी संपूर्ण माणगांव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे तालुक्यातील जनतेला दररोज रात्री विना लाईट विना पंखा, विना एसी प्रचंड उकाड्यात अंधाराचा मच्छरांचा सामना करून मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात आपले दैनंदिन जीवन कंठावे लागत होते.
रायगड जिल्ह्यातील सात लाख एकोणसत्तर हजार तीनशे पस्तीस इतक्या निसर्ग चक्रीवादळग्रस्त शिधापत्रिका धारकांना प्रती कुटुंब ०५ लिटर केरोसीन राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून देण्यात येईल अशी घोषणा अन्न नागरी पुरवठा व नागरी संरक्षण मंत्री माननीय श्री छगन भुजबळ यांनी केली होती.
निसर्ग चक्रीवादळा नंतर केलेल्या या घोषणेला तब्बल एक महिना उलटून सुद्धा अद्याप माणगांव तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोफत केरोसीन उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे तालुक्यातील जनता वारंवार आपापल्या विभागातील रास्त भाव धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक यांच्या कडे जाऊन मोफत केरोसीन विषयी चौकशी करतात परंतू संबंधित परवानाधारक त्यांना सांगतात की, अद्याप आम्हाला वरून मोफत केरोसीनचा पुरवठा झालेला नाही. तर तुम्हाला आम्ही कुठून देणार. तालुक्यातील पुरवठा विभागात मोफत केरोसीन विषयी चौकशी केली असता ते म्हणतात की, आमच्याकडे सुद्धा अद्याप मोफत केरोसीनचा पुरवठा झालेला नाही. अशा उडवाउडवीच्या उत्तरांमुळे आणि शासनाच्या अशा पद्धतीच्या ढिसाळ कारभारामुळे माणगांव तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनता अद्याप मोफत केरोसीनच्या प्रतिक्षेत आहे.

