कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिकार असणारी ‘स्पेशल टास्क फोर्स’ तयार करा..!!
July 09, 2020In: पिंपरी-चिंचवड,पुणे
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. संपूर्ण शहर कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. महापालिका प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे तसेच जनता कर्फ्यूचे आवाहन करूनही नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा बेजबाबदार नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच महापालिका प्रशासनाने कडक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची टीम तयार करावी अशी मागणी सुजाण नागरिक, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोरा यांनी केली आहे.
यासंदर्भात गणेश बोरा यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा उद्रेक होत आहे. अनलॉकनंतर उद्योगनगरी पुन्हा जोमाने पूर्वपदावर येत आहे. पण मास्क लावणे, रस्त्यावर गुटखा-पान खाऊन थूंकने, सोशल डिस्टंन्स राखणे ह्या कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचा काही बेजबाबदार नागरिक फज्जा उडवत आहेत. वाढणारी रुग्ण संख्या आणि तोकडी पडणारी आरोग्य सुविधा पाहता पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येऊ शकते. पण तो लॉकडाउन ह्या कामगारनगरीला परवडणारा नसेल. तेव्हा कोरोनाच्या नियमाची कडक अंमलबजावणी करणे हेच उत्तम राहील.
शहरात सध्या नियम तोडणाऱ्या व्यक्तींवर खूप कमी प्रमाणात कारवाई होताना दिसत आहे. कदाचित अपुरे मनुष्यबळ आणि अधिकार ह्यामुळे कारवाई करण्यात पालिका कर्मचारी ह्यांना अडचणी येत असतील. जसे गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार फक्त अन्न आणि औषध प्रशासनास आहेत. तेव्हा आपण कोरोनाच्या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यास विशेष अधिकार असणारी ‘स्पेशल टास्क फोर्स’ बनवावी. आणि त्यामध्ये इतर विभागातीलही कर्मचारी वर्गास पुढील आठ दिवस कारवाईस जागोजागी पाचारण करावे. गरज भासल्यास आपण सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, शिक्षक ह्यांना देखील ह्यामध्ये सामावून घ्यावे. अशी ‘स्पेशल टास्क फोर्स’ केल्यास नक्कीच ह्यामुळे नागरिकांमध्ये नियम पाळण्यास जरब बसेल आणि कोरोनाला आळा बसेल असे गणेश बोरा यांनी म्हटले आहे.

