shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दर्जेदार पुस्तके व कठीण मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली- ज्ञानेश्वर घ्यार

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि. ०५,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शन सेल व प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन शिबिरातील तिसऱ्या मार्गदर्शनात उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना दर्जेदार पुस्तके व कठीण मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचा कानमंत्र दिला.


सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय बी. आर. तोष्णीवाल (अध्यक्ष, श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ येलदरी कॅम्प तथा सिनेट सदस्य,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड) हे होते,तर प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य एस. जी. तळणीकर यांची होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयामध्ये असणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राबद्दल तसेच सदरील शिबिराच्या आयोजनामागील भूमिका व उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बी. आर. तोष्णीवाल यांनी कोविड-१९ महामारी मध्ये विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून सुरू केलेला सदरील कार्यक्रम हा अत्यंत स्तुत्य असून, अशा प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आपण टाळू शकतो,असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा तसेच महाविद्यालयातील सोयी-सुविधांचा आधार घेऊन आपले भविष्य उज्वल करावे, असे आवाहन देखील केले. सदरील शिबिरातील तृतीय मार्गदर्शक माननीय ज्ञानेश्वरजी घ्यार यांनी दर्जेदार पुस्तके व कठोर मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे,हा कानमंत्र दिला. यासोबतच स्पर्धा परीक्षेबाबत आपल्या स्वतःच्या अनुभवातून, ऑनलाईन प्रश्नपत्रिकांचा सराव,ग्रुप डिस्कशन, चौकस बुद्धी चा विकास,वेळेचा अपव्यय टाळणे, अपयशाची तमा न बाळगणे तसेच एमपीएससी परीक्षे साठी उपयुक्त पुस्तकांची नावे आदी विषयांवर सखोल असे मार्गदर्शन केले. 

सदरील मार्गदर्शन हे झूम मिटिंग व लाइव्ह यूट्यूब च्या माध्यमातून संपन्न झाले. सदरील मार्गदर्शनाचा महाराष्ट्रातील विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा अभ्यासक यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन समन्वयक प्रा.टी.यू. केंद्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. ए. पी. नाईक, प्रा. एस.एस. मरकड,डॉ.व्ही. डी. शिंदे, प्रा. डी. डब्ल्यू. पाटील,डॉ.आर.ए. जोशी, डॉ. एस. आर.पजई,प्रा.एन. एस. गायकवाड,श्री. खनपटे भगवान, श्री.विठ्ठल वलेकर यांनी मेहनत घेतली.
close