वडार समाजाला विशेष पॅकेज देऊन आर्थिक सहाय्य करावे:- प्रा.श्रीकांत मुद्दे यांची मुख्यमंञ्यांकडे मागणी..!!
लातूर । प्रतिनिधी :
वडार जमात ही दगडा-मातीशी संबधित असून या स्वातंञ्याच्या सत्तरीनंतरही शासनाच्या अनेक सोयी-सवलतींपासून आणि आपल्या घटनात्मक हक्कांपासून आजही कोसो दूरच असलेला दिसून येतो. या देशाचे विकासाचे परिमाण समजले जाणारे रस्ते, धरणे, कालवे, हेमांडपंथी मंदिरे,राजवाडे,रेल्वेमार्ग,बोगदे इ. निर्माण करण्यात मोलाचे योगदान असूनही या जमातीच्या प्रश्नांबाबत शासकीय स्तरावर सारं काही आलबेल दिसून येतो. वर्षानुवर्ष वडार जमातीचे अनेक प्रश्न शासकीय स्तरावर प्रलंबित आहेत, म्हणून वडार जमातीच्या उन्नतीसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करावी आणि या जमातीचे प्रश्न तात्काळ मार्गी लागावे म्हणून वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य लातूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांच्या नेतृत्वात मुख्यमंञ्यांना निवेदन देण्यात आले.
वडार समाजातील विद्यार्थ्यांसाठी एम.फिल., पीएच्.डी., नेट-सेट आणि स्पर्धा परीक्षेसाठी फेलोशीप देण्यासाठी बार्टी, सारथीच्या धरतीवर आजपर्यंत अशी कुठलीही योजना नाही ही पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद गोष्ट याच मातीत घडते आहे. हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब आहे.
राज्यातील वडार समाज हा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेला असल्याने या जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस अशा विविध सोयी सुविधांची गरज आहे. त्यात राज्यात कोरोनाचा वाढत जाणारा प्रादुर्भाव लक्षात घेता हाताला काम नसल्यामुळे वडार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत वडार समाजातील तरूण बेरोजगारांना विना अट, विना तारण बिनव्याजी कर्ज देण्याची सोय करावी, मागील तीन महिन्यांचे विज बील माफ करावे असे विविध मागण्यांचे निवेदन भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ,महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हाध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी मा.ना.उद्धवजी ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे.
वडार जमात प्रामाणिकपणे कष्ट करीत आपल्या पारंपरिक व्यवसायाच्या माध्यमातून वर्षानुवर्षे आपला उदरनिर्वाह करीत आहे. तसेच आपल्या प्रश्नांप्रती वेळोवेळी आंदोलने, मेळावे घेऊनही आजतागायत एकही प्रश्न मार्गी लागला नाही. तेव्हा विद्यमान सरकारने तरी योग्य ती दखल घेऊन तात्काळ निर्णय घ्यावेत अन्यथा वडार समाज आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी दिला.
याप्रसंगी प्रा.श्रीकांत मुद्दे, दिनेश धोञे, राजू इटकर, निलेश पवार, बालाजी भांडेकर, नीतीन धोञे, रमाकांत मुद्दे, सचिन वाडीकर आदी समाजबांधव उपस्थित होते.
*वडार समाजाच्या प्रमुख मागण्या :*
१."वडार समाजातील तरूण बेरोजगारांना व्यवसायासाठी विना अट, विना तारण बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. २. एम.फिल., पीएच्.डी.,स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी बार्टी, सारथीच्या धर्तीवर फेलोशीपची सोय करावी. ३. मागील तीन महिन्यांचे विज बील माफ करावे. ४. विद्यापीठ स्तरावरील एम.फिल., पीएच्.डी.चे प्रवेश शुल्क कमी करण्यात यावे. ५. वडार समाजातील विद्यार्थ्यांची सर्व स्तरावरील शैक्षणिक क्षेञातील शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. ६. क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करावे.
या समाजाच्या वरील मागण्या असून विद्यमान सरकारने त्वरीत मान्य करावेत अशी अपेक्षा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य,यांनी व्यक्त केले आहे.

