नितीन गडकरी : ७७७ कोटींच्यामहामार्गंचे उदघाटन व लोकार्पण.......
गडचिरोली :- येत्या दोन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते , पुलांचा प्रश्न मार्गी लावून गडचिरोली जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले. गडचिरोली जिल्ह्यातील ७७७ कोटींच्या महामार्गांचे उदघाटन आणि लोकार्पण 'ऑनलाईन' माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी गडकरी बोलत होते.
प्राणहिता नदी वरील सिरोंच्याजवळील, इंद्रावती नदीवरील पातागुडम येथील पूल, बेजुरपल्ली- अहेरी रस्त्यावरील लंकाचेन येथील पूल व बेजुरपल्ली देवलमरी-अहेरी रस्ता, गरंजी पुस्टोला रस्ता दुरुस्ती अशा झालेल्या कामाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. तसेच पेरमिली बांडिया, पर्लकोटा व वैनगंगा नदीवरील चार नवीन आवश्यक पुलाच्या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के सिंग, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार अशोक नेते, आमदार डॉ. रामदास अंबटकर, आमदार डॉ देवराव होळी, केंद्र शासनाचे सचिव अतिरिक्त सचिव तसेच जिल्हाधिकारी दीपक सिंगला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
आपण राज्याचे बांधकाम मंत्री असताना गडचिरोली जिल्ह्यात ५४ किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार केले होते. २०१४ मध्ये केंद्रीय मंत्री झाल्यानंतर या जिल्ह्यात ५९१ किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले. नागपुरात आपण ब्राॅडगेज मेट्रो आणली असून, हे काम गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानकापर्यंत वाढविणार आहोत. यामुळे अगदी तासाभरात नागपूर गडचिरोलीला पोहचता येईल. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले २५ कोटी रुपये राज्य सरकारने द्यावी अशी विनंती गडकरी यांनी एकनाथ शिंदे यांना केली. आणखी ४०० कोटी रुपयाच्या १०३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे करीत असून दोन वर्षात गडचिरोली जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलेल अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील गौण वनोपजांचा वापर करून येथे बायोडिझेल,अगरबत्ती व अन्य प्रकल्प उभे करून १० हजार युवकांना रोजगार देण्याचा आपला मानस असल्याचे श्री. गडकरी यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे आणि उद्योगासाठी खा.अशोक नेते हे वारंवार पाठपुरावा करीत असल्याचे सांगून श्री.गडकरी यांनी खा.नेते यांची कौतुक केले.
राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील दुर्गम भागाचा विकास जिल्ह्याची असलेली नक्षल ओळख पुसेल असे प्रतिपादन केले. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

