shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खेड तालुक्यातील चासकमान धरण पूर्ण क्षमतेने भरले...!!


भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
विद्याधर साळवे :- दि.२९
खेड तालुका व शिरूर तालुक्यासाठी वरदान ठरलेले खेड तालुक्यातील चासकमान धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात सध्या ९८.३९ टक्के ( ८.४१ टीएमसी ) पाणीसाठा आहे.खेड तालुक्यात पावसाने चांगली जोरदार हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील चासकमान धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून सध्या धरण ९८.३९ टक्के ( ८.४१ टीएमसी ) भरले आहे.

धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शनिवार दिनांक २९ रोजी सकाळी आठ वाजे पासून चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात विद्युत विमोचकाद्वारे २५०  क्युसेक्सने पाणी प्रवाह चालू करण्यात आला असून पावसाचा जोर पाहता हा पाणी विसर्ग ५५० क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे धरण प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. पावसाचा जोर वाढता राहिला तर चासकमान धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागेल.

त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून भीमा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे सांगण्यात आले आहे.चालू वर्षी एक जून पासून आज पर्यन्त एकूण ५७७ मि.मी. पावसाची नोंद चासकमान धरणपरिसरात करण्यात आली आहे.सिंचन व जलविद्युत अशा दुहेरी उद्देशाने बांधलेले खेड तालुक्‍यातील चासकमान धरण हे ८.५३ टीएमसी क्षमतेचे आहे. 

येथील पाण्यावर तीन मेगावॅट वीज निर्मिती होत असून मातीचा भराव व दगडी बांधकाम असलेल्या या धरणाची सर्वोच्च उंची ४६.२८ मीटर तर लांबी ९५८ मीटर आहे. खेड व शिरूर तालुक्यासाठी वरदान असलेले चासकमान धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
close