*लघुकथा*
भातुकलीच्या खेळामधले ....!!
*✒️©®सायली गवारे*
तिची सर्वात आवडती मोरपंखी पैठणी तिने नेसली होती आणि त्यावर नाजूक मोत्याचे दागिने आणि तिचे लांब कुरळे केस तिने मोकळेच सोडले होते . तसे तिला खूप सुंदर दिसायचे ... एका हातात पर्स आणि एका हातात अवनीचा छोटासा हात धरून ,ती त्या सर्व जवळच्या नातेवाईकांनी भरलेल्या लग्नसमारंभात शिरली .
आत शिरताच ,तिला जाणवले कि तिच्याशी कोणीच नीट बोलत नव्हते ,सगळ्यांच्या नजरा तिला टोचत होत्या ,काहींच्या नजरेत , 'स्वःताला काय समजते' , हा भाव होता तर काहींच्या 'बिनडोक' आणि काहींच्या 'स्वार्थी' असे भाव तिला स्पष्ट दिसत होते .... तिच्याबद्दल कुजबुज करतानाही दिसले काही जण ... अगदी गुदमरल्या सारखे तिला वाटतं होते तिथे ...
ती एकदम झोपेतून उठून बसली ,तिला खूप घाम आला होता ..... शेजारी अवनी अगदी शांत झोपलेली होती , तिचा हात घट्ट पकडून ...
तिने घड्याळात पाहिले ,पहाटेचे चार वाजले होते ... बाहेर अंधारलेलेच होते .. तिने अलगद अवनीचा हात बाजूला केला आणि उठून किचन मध्ये गेली .... काहीच सुचत नव्हते म्हणून कॉफी मग हातात घेऊन कॉफी आणि साखर फेटाळत उभी ऱ्हायली....
बाल्कनीत ,ती केलेली कॉफी पित ,त्या शांत झोपलेल्या आकाशाला बघत होती ,वाटले त्याला हलवून म्हणावे, मला पण घे कुशीत तुझ्या ....
"भातुकलीच्या खेळा मधले ,
राजा आणिक राणी ,
अर्ध्यावरती डाव मोडला ,
अधुरी एक कहाणी ....." हे अगदी नकळत गुणगुणायला लागली .. तिचा हि डाव, अर्ध्यावरती मोडणार होता ,तो हि दुसऱ्यांदा ..!!
पाहिल्यावेळेस , दारुड्या आणि मारहाण करणाऱ्या नवऱ्यापासून विभक्त होतांना ,आई वडिलांनी पूर्ण पाठिंबा दिला होता ... काही नातेवाईकांनी तेंव्हाही तिला, लहान मुलीकडे बघून सहन करायचे, असे सल्ले दिले होते ,पण आई वडिलांनी त्यांची चूक सुधारायची ठरवली होती आणि तिला त्याच्या तावडीतून बाहेर काढले होते ... उच्चं शिक्षित पण राक्षस होता तो !!
पण आता दुसऱ्यांदा घटस्फोट ..!! ह्याला तर तिनेच निवडले होते .. दोघेही एकाच ऑफिस मध्ये होते आणि दोघांना आपले सूर जुळत आहे असे वाटले होते , आणि त्यात, तो ४ वर्षाच्या अवनीला हि स्वीकारायला तयार झाला होता ,त्यामुळे तिच्या आई वडिलांसाठी तर तो अगदी देवासारखा तिच्या आयुष्यात आला होता,तिच्या आयुष्याचे अपूर्ण चित्र पूर्ण करायला ...
पण लग्नाच्या पहिल्याच वर्षात तिला जाणवले होते कि त्यांच्या ह्या चित्रातले रंग थोडे फिकटसे आहेत आणि रंग संगती हि तितकीशी जुळत नाहीये .... पण तरीही तिने पुढचे २ वर्षे मनापासून प्रयत्न केले त्या चित्रात थोडे बदल करून त्याला उठावदार बनवण्याचे ,तिनेच नाही तर त्यानेही प्रयत्न केले होते ...
पण तिचा एखाद्या रंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचा , मुळात वेगवेगळे होते त्यामुळे चित्र काही जमूनच येत नव्हते ..!!!
पण आता परत एकदा डिवोर्स घेतला आणि तो हि फक्त 'वैचारिक मतभेद आहेत' , ह्या कारणावरून ,तर स्वप्नात दिसलेल्या 'नजरांना' तिला प्रत्येक्षात सामोरे जावे लागणार होते .... शिवाय अवनीची ,तिच्या भविष्याची काळजी वाटत होती ,आपल्यामुळे तिलाही लोकांचे बोलणे सहन करावे लागले तर ???
स्वःताशीच तिचे द्वंद्व चालले होते ... एक मन म्हणत होते,कि पहिल्याच्या तुलनेत बघितले तर , तो काळाकुट्ट अंधार तर हा अगदी प्रकाश ,इतका फरक होता दोघांमध्ये ...!! पण मग कदाचित तिला कोवळ्या उन्हाच्या प्रकाशी गरज होती आणि त्याच्यात सांजवेळेच्या आधीच्या प्रकाशाची ऊब होती ....!!
ह्या सगळ्या विचारांचा कल्लोळ ,आसवं बनून तिच्या डोळ्यात अगदी तुडुंब येऊन भरला आणि तेंव्हाच ,सूर्याची पहिली किरण त्यांच्यावर पडली...आणि एक टप्पोरा थेंब डोळ्यातून ओघळला ....
मागून अवनी चा आवाज आला - " आई ,तू इथे काय करते आहे ??" आणि मग जवळ येऊन तिने तिचे डोळे पुसले आणि अगदी निरागसतेने तिला म्हणाली
" आई ... तुला काकांच्या घरी करमत नाही ना ... आणि आजीच्या घरातून आज आपल्याला काकांच्या घरी जावं लागेल ,म्हणून तू रडतीयेस का ??.... नको रडूस .. काका छान आहेत ... त्यांना मी समजावेल कि आईला नाही करमत तिथे ... तुला जिथे आवडेल तिथेच राहू आपण "
कधीच ह्या विषयावर न बोलता हि ,त्या चिमुकल्या जिवाने आपल्या मनातले ओळखले होते बघून, तिला अजूनच गहिवरून आले ,तिने अवनीला घट्ट मिठी मारली आणि तिच्या खूप साऱ्या पाप्या घेतल्या...
पण त्या चिमुकल्या डोळ्यांमधली काळजी आणि तिचे ते शब्द , तिला एक वेगळाच धीर आणि आधार देऊन गेले होते ..!!
ते झोपलेले आभाळ हि आता सूर्य प्रकाशाने पुन्हा जागे झाले होते, एक नवीन दिवस जगण्यासाठी ....!!

