गडचिरोली :- जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाची २.८६ कोटी रुपयांची रक्कम बनावट चेकच्या आणि स्वाक्षऱ्या च्या माध्यमाने लंपास करणाऱ्या या आरोपींकडून १ किलो १६० ग्रॅम सोने जप्त केले असून त्यांची बाजारभावानुसार किंमत साठ लाख असल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे. दरम्यान या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे यामुळे आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ८ झाली आहे.
वर्षभरापूर्वीच या या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते गेल्या १५ ऑगस्ट रोजी ६ आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केल्यानंतर त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. यादरम्यान त्यांनी हा अपहार कसा केला त्या अपहारातील रकमेची विल्हेवाट कशी लावली, त्यांना कोणी कोणी मदत केली तशी बरीच माहिती पोलिसांना दिली. सुधाकर गोपीचंद कांबळे(३८) रा. रामकृष्णनगर दिघोरी , नागपुर संजय ज्ञानेश्वर दळवी(४८) रा. जलालपूर, शारदा चौक नागपूर अशी अटक करण्यात आलेल्या नव्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
तपास दरम्यान आरोपी स्नेहदीप सोनी याने अपहार केलेल्या रकमेतून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली असल्याची कबुली तपासादरम्यान दिली. त्यामुळे त्यांच्या नागपूर येथील राहत्या घरून तसेच बँकेच्या लाॅकरमधून ६० लाख रुपये किंमतीचे १ किलो १६० ग्रॅम सोने जप्त केले. तपासादरम्यान या आरोपींनी भंडारा जिल्हा परिषदेतूनही ६ कोटी रुपयांचा शासकीय रकमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकरणात नवे दोन आरोपी पकडण्यात आले असून आणखी काही आरोपी पकडले जाण्याची शक्यता आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलिस अधीक्षक शैलेश बळकवडे, अपर पोलीस अधीक्षक रोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनात पोलिस अधिकारी उल्हास भुसारी करत आहेत.

