shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षांनी गायलेला गणेश मंत्र प्रकाशीत ; किरण काळे यांच्यासह नगर भूषण अंजली - नंदिनी गायकवाड यांचा मंत्राला आवाज..!!

नगर : सध्या गणेशोत्सव सुरू आहे. कोरोना मुळे दरवर्षी असणारा तामझाम या वर्षी नाही. परंतु लॉकडाऊनच्या काळात अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, सारेगामापा लिटिल चॅम्प विनर अंजली - नंदिनी गायकवाड या नगरच्या त्रिरत्नांच्या सुमधुर आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आलेला गणेश मंत्र प्रकाशित करण्यात आला आहे.
 
हिंदू धर्मीयांमध्ये गणेश देवतेला अनन्यसाधारण स्थान आहे. सर्व धर्मीय देखील गणेशाचे पूजन करतात. यातून समाजामध्ये असणारे धार्मिक सलोखा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. देशभरामध्ये नावाजलेल्या मुंबईच्या अल्ट्रा म्युझिक कंपनीने हा मंत्र प्रकाशित केला असून यूट्यूबच्या माध्यमातून गणेश भक्तांसाठी आणि श्रोत्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
 
मुंबईचे सुप्रसिद्ध संगीतकार संजयराज गौरिनंदन यांनी हा मंत्र संगीतबद्ध केलेला आहे. गौरीनंदन यांनी संगीतबद्ध केलेला हा मंत्र यापूर्वी अभिनयाचा बेताज बादशाह अमिताभ बच्चन त्याचबरोबर सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या आवाजात प्रसिद्ध झालेला आहे. या दोन सेलिब्रिटीं नंतर किरण काळे आणि गायकवाड भगिनी यांना हा मंत्र गाण्याची संधी संगीतकार गौरीनंदन यांनी दिल्यामुळे नगर शहराच्या सांगीतिक वाटचालीमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
 
गणेश मंत्र प्रकाशित झाल्याबद्दल किरण काळे यांनी आनंद व्यक्त करीत म्हटले आहे की संगीतकार संजयराज गौरिनंदन यांनी आम्हा तिघांनाही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. अंजली - नंदिनी गायकवाड या अहमदनगरच्या लता-आशा आहेत. त्यांच्यासारख्या प्रतिभावान आणि गोड गळ्याच्या प्रतिथयश गायिकां समवेत मला गाण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. त्यांचे गुरु अंगद गायकवाड यांचे देखील या मंत्र निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे.
 
काळे पुढे म्हणाले की, राजकारणामध्ये जरी मी पूर्णवेळ समाजासाठी सेवेत असलो तरी देखील गायन-वादन हा माझा लहानपणा पासूनचा छंद आहे. माझे वडील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव काळे यांनी लहानपणीच माझी गायनातील रुची ओळखून मला गाण्याचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. सुप्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्यासारखे अत्यंत नामांकित, लोकप्रिय आणि गुणी गुरु मला लाभले. हे मी माझे भाग्य समजतो. शालेय जीवनात असताना नगर शहरामध्ये प्रकाश शिंदे (हार्मोनियम), मकरंद खरवंडीकर (गायन) आणि सतीश आचार्य (तबला) यांच्याकडे मला संगीताचे धडे गिरवायला मिळाले. त्यातूनच माजी सांगीतिक पायाभरणी झाली.
  
अंजली - नंदिनी गायकवाड यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, गणपती हे  आपल्या सगळ्यांचेच आराध्य दैवत आहे. आम्हाला हा गणेश मंत्र गाण्याची संधी मिळाली याबद्दल आम्ही आनंदी आहोत. किरण काळे यांच्या बरोबर गाण्याचा अनुभव देखील अत्यंत आनंददायी होता.या गणेश मंत्राचे रेकॉर्डिंग हे मुंबईच्या स्ट्रिंग स्टुडिओ तसेच अहमदनगरच्या राजेंद्र टाक (आर.टी.) स्टुडिओमध्ये मध्ये पार पडले. गिरीश सायकीया (मुंबई), ओंकार टाक (नगर) यांनी साऊंड इंजिनिअर म्हणून काम पाहिले.
 
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जेष्ठ नेते श्रीकांत बेडेकर, दीप चव्हाण, ज्ञानदेव वाफारे आदींनी या उपक्रमाबद्दल तिन्ही गायकांचे अभिनंदन केले आहे.
 
अवलिया किरण काळे
नगर शहराच्या राजकारणामध्ये किरण काळे हे सुपरिचित आहेत. गणेश मंत्राच्या निमित्ताने त्यांच्यातील एक उत्तम गायक नगरकरांना ऐकायला मिळाला आहे. यापूर्वी देखील त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित छत्रपती यूथ फेस्टिवलमध्ये सुप्रसिद्ध सिने अभिनेते सचिन पिळगावकर, संतोष जुवेकर त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह राज्य व देशपातळीवरील विविध क्षेत्रातील नामांकित वीसहून अधिक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यातून त्यांच्यातील उत्तम मुलाखतकार देखील नगरकरांना पाहायला मिळाला होता.
 
थिंक ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी अभिनेते स्व. सदाशिव अमरापुरकर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ते करतात. या माध्यमातून साहित्य, संगीत, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रांसाठी काळे यांनी केलेले काम नगरकरांना परिचित आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये लीलया यशस्वी वावर असणाऱ्या किरण काळे यांच्या अवलिया पणा बद्दल नगर शहरातील नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
 



 
 
close