लोहा । प्रतिनिधी (अशोक सोनकांबळे) :
गरीब कुटुंबास एक किलो दाळ स्वस्त धान्य दुकानामार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला असताना मात्र त्याची अंमलबजावणी लोहा तालुक्यात होताना दिसत नाही.अजून दाळ आलीच नाही,आल्यावर देऊ अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन महागड्या दाळीवर पूर्ण डल्ला मारण्याचा प्रयत्न दुकानदारांकडून होत असल्याचे चित्र समोर येत असून गोरगरीब लाभधारकास मात्र ऐन सणासुदीच्या काळात हक्काच्या दाळीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
कोरोना महामारीच्या काळात शासन जनतेची काळजी घेत आहे.कामधंदे पूर्णतः कोलमडले असल्यामुळे दोन वेळचे जेवण मिळणे देखील दुरापास्त झाले आहे.त्यामुळे राशन दुकानामार्फत गोरगरीब जनतेला आधार देण्याचा शासनाच्या वतीने प्रामाणिक प्रयत्न होताना दिसून येत असला तरी शासनाच्या प्रयत्नांची अमलबजावणी व्यवस्थीत होताना दिसत नाही.योजनेतील प्रत्येक कुटुंबाला महिन्याला एक किलो दाळ देण्याचे शासनाचे प्रयोजन आहे.
मात्र ऐन सनासुदीच्या काळात दाळीचे वाटप व्यवस्थित होत नसल्याचे ओरड लाभधारकातून होत आहे.अजून दाळ आलीच नाही.आल्यावर वाटप करू असे ठेवणीतले उत्तर राशन दुकानदाराकडून ऐकायला मिळत असल्याने चतुर दुकानदार शासनाच्या महागड्या दाळीवर डल्ला मारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.योजनेतील लाभधारकास दाळी पासून दूर ठेवणाऱ्या राशन दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी आर्य वैश्य लोहा तालुका अध्यक्ष संतोष चेऊलवार यांनी केली आहे.

