गडचिरोलीमध्ये नक्षल्याचा हल्ल्यात एक जवान शहीद तर दुसरा जखमी
गडचिरोली,ता.१४ :- किराणा दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर नक्षल्यांनी गोळ्या झाडल्या. यात एक जवान शहीद झाल्याची घटना आज घडली. अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असलेल्या भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रात ही घटना आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली आहे.
दुष्यांत नंदेश्वर(२६) असं शहीद जवानाचं नाव आहे. पोलीस जवान पोलीस मदत केंद्राच्या बाहेर दुकानात काही सामान घेण्यासाठी गेल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याच दरम्यान नक्षल्याच्या ॲक्शन टीमने हा हल्ला केला आहे. दुष्यंतचा मृतदेह गडचिरोलीला आणण्यात आला असून, जखमी दिनेश भोसले यास नागपूरला हलविण्यात आला आहे.
दु्ष्यंत नंदेश्वर हा गडचिरोली येथील रहिवासी होता. शहरातील गोकुळनगर परिसरातील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयासमोरील भागात तो कुटुंबीयांसह वास्तव्य करीत होता. शहीद सप्ताहादरम्यान पोलिसांच्या बंदोबस्तामुळे नक्षलवाद्यांना कुठलीही घटना घडवून आणता आली नाही. यानंतर पोलिसांनी दोन जहाल नक्षल्यांना अटक केली होती. तर दोघांनी आत्मसमर्पण केले होते. या घटनांमुळे बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

