गडचिरोली (कोरची) ता. २३ :- तालुक्याच्या बेळगाव पोलिसांनी नाकाबंदी करून कत्तलीसाठी जनावरे नेणारे पीकअप वाहन २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पकडले. या प्रकरणातील दोन आरोपी वर गुन्हा दाखल केला आहे.
बेळगाव पोलीस नाकाबंदी वर असताना कोरची-पुराडा मार्गावरून संशयितरित्या एमएच ४० बीएल १५५९ क्रमांकाचे पीकअप वाहन येत असल्याचे दिसले. या वाहनास चौकशीसाठी थांबवले असता त्यात अवैधरित्या विनापरवाना चार जनावरांची कोंबून वाहतूक करीत असल्याचे दिसून आले.
वाहनात दोन म्हशी व दोन रेडे असे चार जनावरे आढळून आले. या जनावरांना कत्तलीकरिता नेत असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. वाहन चालक राहुल बाबुराव सहारे (२३) रा. धामणी जि. भंडारा व त्यांचासोबती सतीश बबलू धनविजय (२०) रा. भिवापूर जि. नागपूर या दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनातील चार ही जनावरांची सुटका करून त्यांना बेळगावच्या कोंडवाड्यात पाठविण्यात आले आहे. तर या प्रकरणातील पुढील तपास बेळगावचे पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर करीत आहेत.

