रुईछत्तीसी (प्रतिनिधी): सततच्या पावसाने नगर तालुक्यातील रुईछत्तीसी, दहिगाव ,साकत खुर्द, वाटेफळ,गुणवडी,हातवळण,मठपिप्रिं,वाळुंज,पारगाव,शिराढोण, नारायणडोह, या परीसरात ज्वारीच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. शेतकरी आता जमिनीच्या वापश्याच्या प्रतीक्षेत आहेत. मुगाचे पीक साधल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली आहे. शेतकऱ्यांनी आता ज्वारी पेरणी सुरू केली असती परंतु गेल्या आठ ते दहा दिवसापासून या भागात दररोज जोरात पाउस बरसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ज्वारीची पेरणी लांबणीवर गेली आहे. दररोज येणाऱ्या पावसाने ओलावा कायम आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून उन्हाची तीव्रताही फारच कमी आहे. त्यामुळे वाफसा होत नाही. परिणामी ज्वारीचा हंगामा संपण्याची भिती शेतकऱ्यांना सतत लागली आहे. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसाय करतात जनावरांना घरचा चारा म्हणून ज्वारीचा कडबा अतिशय आवश्यक असतो. त्यात पावसाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परिणामी ज्वारीची पेरणी लांबली तर उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण होईल.
यंदा सिना नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी प्रवाह चालू आहे. 'शेतकरी पाऊसाने कधी सुखावतो तर कधी दुखावतो" पण शेतकरी फॅक्टरी रात्रंदिवस चालुच असते. कोरोना येऊ नाही तर स्वाईनफुल्यु येऊ...!

