विकेल ते पिकेल’ योजनेवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा अकोले येथील विकास देवराम आरोटे यांच्याशी संवाद
आसामी निळा भात पिक संवर्धन व विक्री व्यवस्थापनावर चर्चा
शिर्डी प्रतिनिधी :
कु.किरण जाधव
‘विकेल ते पिकेल’ या धोरणावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज कृषि विषयक विविध योजनांच्या संदर्भात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषि मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकरा प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषि आयुक्त धीरज कुमार यावेळी उपस्थित होते. कृषि विभागाच्या यु-ट्युब चॅनेलवर शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादाचे थेट प्रसारण करण्यात आले होते.
अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथील अगस्ति शेतकरी उत्पादक कंपनीचे संस्थापक अध्यक्ष विकास देवराम आरोटे व त्यांच्या पत्नी अनिता विकास आरोटे यांच्याशी आजच्या कार्यक्रमात आसामी निळा भात पिक संवर्धन व विक्री व्यवस्थापन यावर मुख्यमंत्री महोदयांनी चर्चा केली.
शेतकऱ्याचे नाव : विकास देवराम आरोटे संस्थापक अध्यक्ष, अगस्ति शेतकरी उत्पादक कंपनी गावाचे नाव : मेहंदुरी, तालुका :अकोले, जि.अहमदनगर मोबाईल क्रमांक : 9975299214
शेतकऱ्याने केलेला प्रयोग: आसामी निळा भात संवर्धन व विक्री व्यवस्थापन
थोडक्यात माहिती
आदिवासी भागातील शेतकरी उत्पादक कंपनी आहे. अकोले परिसरातील शेतकऱ्यांना संघटित करून अगस्ति फार्मर्स प्रोडुसर कंपनी मर्यादित 2016 मध्ये स्थापन केली. सध्या 259 सभासद आहेत.
मागील वर्षी आसाम येथील कृषि अधिकारी यांचे पथक कंपनीचे काम पाहण्यासाठी मेहंदुरी येथे आले. तेथील कृषि तज्ञ रावसाहेब बेंद्रे यांच्या मदतीने त्यांनी तेथील स्थानिक आसामी भाताचे तीन किलो बियाणे दिले होते.
सदर बियाणे विकास देवराम आरोटे यांनी स्वत: पाच गुंठे क्षेत्रात लागवड केली. त्याचा अभ्यास केला. यापासून 210 किलो बियाणे तयार झाले व जास्त चारा मिळाला.
या वर्षी कृषि विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाने नव्वद किलो बियाणे वीस शेतकऱ्यांना सहा एकर क्षेत्रासाठी बीज प्लॉट म्हणून दिले. मी स्वत: पंचवीस गुंठे क्षेत्रावर प्लॉट केला आहे.
हा वाण तांदूळ निळसर जांभळा आहे. खाण्यासाठी पौष्टिक आहे. तसेच औषधी गुणधर्म असल्याने बाजारात याचे मूल्य तीनशे ते चारशे रुपये किलो आहे. म्हणून त्याचे संवर्धन आवश्यक आहे. त्यामुळे या वाणाचा प्रसार करण्याचे ठरवले,
या वाणात ई जीवनसत्व, लोह, जस्त, अन्थोसायनिन असे गुणधर्म आहे. औषधी म्हणून या तांदळाचा वापर केला जातो, म्हणून याला मागणी जास्त आहे. सध्या हा भात पोटरी अवस्थेत आहे.
अगस्ति शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून हे बियाणे पुढील वर्षी ५० एकर क्षेत्रावर दिले जाईल व पुन्हा खरेदी केले जाईल. त्याचा हातसडीचा तांदूळ तयार करून ब्रॅंड तयार केला जाईल. व त्याची विक्री केली जाणार आहे.
शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेत हा प्रयोग महाराष्ट्र पातळीवर नेऊन त्याचे व्यावसायिक मूल्य वाढणार आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री महोदय व शासनाचे आभार मानले. या प्रयोगासाठी कृषि विभाग व आत्मा यांचे मार्गदर्शन मिळाले.
यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा, अहमदनगर शिवाजी जगताप, अकोले तालुका कृषि अधिकारी प्रवीण गोसावी, कोतूळ मंडळ कृषि अधिकारी बाळासाहेब बांबळे, आत्मा तंत्र व्यवस्थापक बाळनाथ सोनवणे, अकोले मंडळ कृषि अधिकारी राजाराम साबळे, कृषि पर्यवेक्षक संतु वारडे, मेहंदुरी कृषि सहाय्यक हरिभाऊ जाधव, नवनाथ आरोटे, संजय पाटोळे,राजेंद्र आरोटे उपस्थित होते.

